रत्नागिरीरत्नागिरी नगर परिषदेत चार कोटींचा ‘शौचालय घोटाळा?

रत्नागिरी नगर परिषदेत चार कोटींचा ‘शौचालय घोटाळा?

उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांनी केला गंभीर आरोप.. उपनगराध्यक्ष व अभियंता मध्ये चांगलीच जुंपली….
बनावट कामे दाखवून निधी लाटल्याचा आरोप चौकशीचा इशारा.

रत्नागिरी नगरपालिकेवर आधीच सुमारे ४५ ते ५०कोटी रुपयांचा आर्थिक बोजा असताना, आता पालिकेतील चार कोटी रुपयांचा ‘शौचालय घोटाळा’ उघडकीस आल्याचा दावा उपनगराध्यक्ष तथा भाजप नगरसेवक समीर तिवरेकर यांनी केला आहे. बनावट कामे दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करून निधी हडप करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

समीर तिवरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात एकूण ८० सार्वजनिक शौचालये आहेत. गेल्या चार वर्षांच्या प्रशासक राजवटीत या शौचालयांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला. कागदपत्रांची तपासणी केली असता, प्रत्यक्षात १ हजार रुपयांचे काम असतानाही ५ हजार रुपयांची बिले काढण्यात आली.

काही शौचालयांच्या दुरुस्तीच्या नावावर दोन ते तीन वेळा खर्च दाखवण्यात आल्याचेही आढळून आले. विशेष म्हणजे ही सर्व बिले मंजूर होऊन संबंधितांना पैसे अदा करण्यात आले आहेत.

कागदोपत्री कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला असला तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. काम न करताच निधी लाटल्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे तिवरेकर यांनी सांगितले.

सध्या नगरपालिकेच्या खात्यात अवघे १२ लाख रुपये शिल्लक असून, कंत्राटदार व इतर देणी मिळून पालिकेवर सुमारे ४५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या या उधळपट्टीचा भार आता सामान्य नागरिकांवर करवाढीच्या रूपाने टाकला जाणार असल्याचा आरोप तिवरेकर यांनी केला. प्रशासक राजवटीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा दावा करत, या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे

Breaking News