रत्नागिरी वन विभागाचा राज्यात डंका- विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक—
रत्नागिरी- वनसंपत्तीचे प्रभावी संरक्षण, वनव्यवस्थापन आणि वनसेवेतील उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मानाच्या राज्यस्तरीय पदकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने ठसा उमटवला आहे. महसूल व वन विभागाने दि. २५ मार्च २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, चिपळूण रत्नागिरी येथे कार्यरत विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा शोभा नरेंद्र देसाई यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे.
श्रीमती देसाई यांच्या या सन्मानामुळे रत्नागिरी वनविभागात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या राज्यस्तरीय गौरवात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच नव्हे, तर मैदानी पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला आहे. रत्नागिरी वनवृत्तातील वनपाल श्री. सुरेश आत्माराम उपारे आणि श्री. रामदास दत्तात्रय खोत यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. तसेच वनसंरक्षणाच्या कामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एका वनरक्षकास रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.
या पदकांसाठी निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर पद्धतीने राबविण्यात आली. अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षते खालील समितीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष कामगिरीची सखोल छाननी करून अंतिम निवड केली.
महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही पदके जाहीर केली आहेत. वन/वन्यजीव संरक्षण, व्यवस्थापन, वनविस्तार आदी सहा विविध कार्यप्रकारांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील या मानकरी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशाची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. या सन्मानामुळे वनसेवेत कार्यरत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मानले जात आहे..
