राजापूर तालुक्यातील होळी, जैतापूर आणि वाडापेठ येथे एसटी निवाराशेडचे लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा

0
5

🔴राजापूर तालुक्यातील होळी, जैतापूर आणि वाडापेठ येथे एसटी निवाराशेडचे लोकार्पण; प्रवाशांना मोठा दिलासा!

🔴आमदार किरण सामंत यांच्या हस्ते निवाराशेडचे उद्घाटन; ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न

राजापूर : राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटी बसची वाट पाहताना ऊन, पाऊस आणि अन्य नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी होळी, जैतापूर आणि वाडापेठ या गावांमध्ये उभारण्यात आलेल्या एसटी निवाराशेडचे उद्घाटन आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे संबंधित गावांमधील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः एसटी बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांना निवारा नसल्याने उन्हाळ्यात कडक ऊन आणि पावसाळ्यात पावसाचा त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन गावांमध्ये एसटी निवाराशेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “जनतेच्या प्रत्येक अडचणीचे शंभर टक्के निराकरण करणे कदाचित शक्य होणार नाही; मात्र जोपर्यंत मी आमदार म्हणून कार्यरत आहे, तोपर्यंत माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचा आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहील.”

मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावणे याला आपण प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी निवाराशेड ही दिसायला छोटी सुविधा असली तरी ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी तिचे महत्त्व मोठे आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा दैनंदिन प्रवासात उपयोग होणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. गावागावांतील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशा सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रत्येक गावातील वाडीप्रमुख, मानकरी, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here