रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी व GCF–ECRICC प्रकल्प, कांदळवन कक्ष रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एसआरआय पद्धतीने भातशेतीचा अभिनव उपक्रम
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा भूभाग हा जांभ्या (कातळ) जमिनीचा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कालांतराने शेतीकडे पाठ फिरवली आहे.
शेतकऱ्यांना पुन्हा शेतीकडे वळविणे, आधुनिक व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि GCF–ECRICC प्रकल्प, कांदळवन कक्ष, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एसआरआय (System of Rice Intensification) पद्धतीने भातशेतीचे प्रात्यक्षिक प्रकल्प कोळंबे व खेडशी येथे राबविण्यात येत आहेत.
या प्रकल्पांतर्गत पंधरा दिवसांपूर्वी पेरण्यात आलेल्या रोपांची यशस्वी उगवण झाल्यानंतर भात लावणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, कृषीप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनीही उत्साहाने प्रत्यक्ष शेतात उतरून नांगरणी आणि भात लावणीचा अनुभव घेतला. आधुनिक शेतीबरोबरच शेतीची आवड आणि संस्कार नव्या पिढीमध्ये रुजावेत, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
*एसआरआय पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणी अनेक मोठी रोपे लावण्याऐवजी एकच कोवळे रोप योग्य अंतरावर लावले जाते. या पद्धतीत शेत सतत पाण्याखाली ठेवण्याची आवश्यकता नसते; केवळ आवश्यक तेवढा ओलावा राखला जातो. तसेच पारंपरिक ‘भाजवळ’ करण्याची गरज नसून ,पाण्याची बचत देखील होते, मजुरी व उत्पादन खर्च कमी होतो, जमिनीचे आरोग्य टिकून राहते आणि अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही पद्धत रत्नागिरीच्या जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीवरील विश्वास वाढविणे, त्यांना पुन्हा शेतीकडे प्रेरित करणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देणे हा या संयुक्त उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यात हा प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड.मनिष नलावडे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाला हृषीकेश भाटकर (District Coordination Officer), संकेत पवार (Project Associate – Agriculture) आणि सुमित कुळे (Project Associate – Agriculture) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटे. माधुरी कळंबटे व रोटे. वैभव सरदेसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच अॅड. महेंद्र मांडवकर, जिल्हा परिषद सदस्य यांनी शेतीसाठी जागा उपलब्ध करून देत या प्रकल्पाला मोलाचे सहकार्य केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे, सचिव आनंद चौगुले, खजिनदार धीरज वेल्हाळ, मेंबरशिप चेअर श्रीकांत भुर्के, फाऊंडेशन डायरेक्टर निलेश मुळ्ये, ज्येष्ठ रोटेरियन धरमसीभाई चौहान,विजय पवार, विनायक हातखंबकर, मंदार सावंतदेसाई, प्रमोद कुलकर्णी, रूपेश पेडणेकर, परेश साळवी,रोहित वीरकर,सुरेंद्र यारम तसेच रोटरी क्लबचे सदस्य, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
