सावर्डे – जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण येथे आयोजित करण्यात आलेले ५३ वे तालुकास्तरीय बालविज्ञान प्रदर्शन व मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या विज्ञान प्रदर्शनात सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांनी विविध विभागांत उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रश्नमंजुषा विभागात विद्यालयाच्या आदिती शेंडगे व श्रद्धा चव्हाण यांनी सहभाग नोंदवून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या विद्यार्थिनींना श्रेया राजेशिर्के यांनी मार्गदर्शन केले.
प्रयोगशाळा सहाय्यक विभागात साक्षी माळी व प्रशांत चव्हाण यांनी पाणी संवर्धन या विषयावर आधारित प्रतिकृती सादर केली. उत्कृष्ट विवेचन व मानवोपयोगी संकल्पनेमुळे या प्रतिकृतीस उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
प्राथमिक शिक्षक प्रतिकृती (इयत्ता सहावी ते आठवी) विभागातून सहाय्यक शिक्षिका वैभवी भुवड यांनी रक्ताभिसरण व संबंधित घटक या विषयावर प्रतिकृती सादर केली.
तसेच प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती (इयत्ता सहावी ते आठवी) विभागातून प्रगती बुदर, ओम तेटांबे व सार्थक गुजर यांनी स्मार्ट एक्वेरियम अँड वॉटर प्युरिफिकेशन ही प्रतिकृती सादर करून उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना वर्षा चव्हाण, मंगेश दाते व अविनाश पोतदार यांनी मार्गदर्शन केले.
माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती (नववी ते बारावी) विभागातून हर्षल बुदर, शशांक पाटसुते, हिमेश शिंदे व आदित्य खरात यांनी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही प्रतिकृती सादर केली. या प्रतिकृतीस उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांना सिद्धेश जाधव व पाष्टे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
प्राथमिक दिव्यांग विभागात रुद्र जाधव व आयुष्य लिवे यांनी माय नीड्स अँड लोकेशन ही प्रतिकृती सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना दामिनी महाडिक यांनी मार्गदर्शन केले.
माध्यमिक शिक्षक प्रतिकृती (नववी ते बारावी) विभागातून विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक शिवलिंग सुपनेकर यांनी मॅजिक ऑफ कॅल्क्युलेशन डिफरन्शिएशन ही प्रतिकृती सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला. ही प्रतिकृती आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी विद्यालयातील विज्ञान विभागातील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम, शालेय समितीचे चेअरमन व ज्येष्ठ विश्वस्त शांताराम खानविलकर, संस्थेचे पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
