विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेचे विविध मागण्यांसंदर्भात कोकण विभागाचे विधानपरिषद आमदार मा. श्री. प्रमोदजी जठार साहेब यांना निवेदन–
विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागाचे विधानपरिषद आमदार मा. श्री. प्रमोदजी जठार साहेब यांची भेट घेऊन विलवडे रेल्वे स्टेशनच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.
यावेळी कार्याध्यक्ष श्री. रमेश काटकर, सल्लागार श्री. सुभाष लाड, सरचिटणीस श्री. राज हांदे, सहचिटणीस श्री. विश्वनाथ आयरे, सदस्य श्री. प्रसाद जाधव, श्री. प्रशांत पालकर आदी उपस्थित होते.
विलवडे रेल्वे स्टेशनला जोडलेल्या सुमारे ७२ गावांमधील मोठ्या प्रवासी वर्गाची संख्या, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत सातत्याने करण्यात येत असलेल्या विविध मागण्यांकडे कोकण रेल्वे व रेल्वे बोर्डाकडून होत असलेले दुर्लक्ष, याबाबत आमदार महोदयांना सविस्तर माहिती देण्यात आली.
संघटनेच्या १० प्रमुख मागण्यांपैकी जनशताब्दी, मांडवी व नेत्रावती एक्सप्रेसला विलवडे रेल्वे स्टेशन येथे थांबा मिळणे ही प्रमुख मागणी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या मागणीसाठी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मा. आमदार श्री. प्रमोदजी जठार साहेब यांनी दिले.
यावेळी सल्लागार श्री. सुभाष लाड यांनी लांजा-राजापूर नागरिक संघाच्या माध्यमातून माचाळ हे पर्यटनस्थळ तसेच प्रभू सरदेशी वाडा, गोविळ येथील विविध समस्या व आवश्यक उपाययोजनांबाबतही निवेदन सादर केले. संबंधित ठिकाणी पुढील काळात प्रत्यक्ष दौरा आयोजित करून आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आमदार महोदयांनी दिले.
तसेच कोकणातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायासाठी शहरांकडे वळत असल्याबद्दल आमदार महोदयांनी खंत व्यक्त केली. तरुणांनी शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या कोकणातच व्यवसाय, आधुनिक शेती व पर्यटनाच्या माध्यमातून प्रगती साधावी, यासाठी तरुण व शेतकरी वर्गाने एकत्रितपणे पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विलवडे रेल्वे स्टेशनच्या हक्काच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देण्याच्या दिशेने आमदार मा. श्री. प्रमोदजी जठार साहेब यांची आजची भेट हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
विलवडे रेल्वे स्टेशनच्या हक्काच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार!
— विलवडे रेल्वे प्रवासी संघटना
