Uncategorizedविलास महाडिक यांना ‘लोकप्रेरणा’ कोकण गौरव पुरस्कार

विलास महाडिक यांना ‘लोकप्रेरणा’ कोकण गौरव पुरस्कार

विलास महाडिक यांना ‘लोकप्रेरणा’ कोकण गौरव पुरस्कार

चिपळूण :: येथील व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘लोकप्रेरणा कोकण गौरव पुरस्कार’साठी चिपळूण तालुक्यात पहिले कृषी पर्यटन सुरु करणारे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विलास दत्ताराम महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. उद्या (१९ जून) संध्याकाळी ४ वाजता खेंड येथील माऊली लॉन्स सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ. शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सह. दुय्यम निबंधक वर्ग २ श्रीमती स्मिता गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम आणि माजी शिक्षण विस्तार अधिकारी रमाकांत पवार उपस्थित राहणार आहेत.

अलिकडच्या काळात एखाद्या गुरुजीचं जगणं आपल्याला आपलं वाटावं, सर्वांपरिचं ते जगणं आपण आपल्या काळजात साठवून ठेवावं याची निरंतर जाणीव करून देणारे ‘दुर्मीळ गुरुजी’ म्हणून विलास दत्ताराम महाडिक यांचेकडे पाहिलं जातं. एप्रिल २०२४ मध्ये सेवानिवृत्त झालेले महाडिक हे कोकणातील चिपळूण तालुक्यातील खेण्ड आणि शिरळ या दोन केंद्रांचे केंद्रप्रमुख आणि उक्ताड जि. प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक होते. संभ्रमाच्या वर्तमानात कोणीही कधीही स्वच्छ मनाने साद घालावी नि अवांतर काहीही न सांगता महाडिक गुरुजींनी साथ द्यावी, असं त्यांचं वागणं आहे.

५ एप्रिल १९६६ रोजी निवळी (चिपळूण) गावी त्यांचा जन्म झाला. त्यांनी जुलै १९८६मध्ये डी.एड. शिक्षण पूर्ण केलं. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात खेड तालुक्यातील जि. प. शाळा शिंगरी येथून प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षकी पेशास प्रारंभ केला. पुढे पेढे पाणकरवाडी, गोवळकोट मराठी, उक्ताड, गुहागर तालुक्यातील मासू, आणि पुन्हा जिल्हा परिषद शाळा उक्ताड येथे काम केले. त्यांनी जुलै १९९२मध्ये बी.ए. तर २००१साली बी.एड. हे व्यावसायिक पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळून शैक्षणिक, ग्रंथचळवळ, ग्रंथनिर्मिती, सामाजिक आणि पर्यावरणीय कामात दखलपात्र ठसा उमटविला आहे. चिपळूण तालुक्यातील पहिले कृषी पर्यटन केंद्र त्यांनी उभारले आहे. त्यांनी आपल्या अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार देत प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधल्याचे जाणवते. चिपळूणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांच्या सहकार्याने राज्याची राजधानी मुंबईचे शालेय विद्यार्थ्यांना बालवयात दर्शन घडविणारे गुरुजी अशीही त्यांची ओळख आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाने जिल्हा व राज्यस्तरीय (२००६-०७) आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे इतरही असंख्य पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. ‘पद्मभूषण’ अण्णासाहेब हजारे आणि ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या सहकार्याने राज्यभर त्यांनी केलेले पर्यावरण जनजागरणाचे काम सर्वश्रुत आहे.

आपले गुरु ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ मो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. साहित्यिक-पत्रकार धीरज वाटेकर लिखित या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी, विलासरावांच्या ‘गुरुदक्षिणा’ या लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.’

या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाडिक यांचेसह महादेव दत्ताराम चव्हाण यांना लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्कार, भास्कर रामचंद्र कदम यांना लोकप्रेरणा ज्ञानरत्न पुरस्कार, प्रमोद शंकर ठसाळे यांना लोकप्रेरणा प्रशासकीय रत्न पुरस्कार, प्रकाश अनंत गांधी यांना लोकप्रेरणा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार, मकरंद माधव भागवत यांना लोकप्रेरणा निर्भीड लेखणी गौरव पुरस्कार, नयनिश रमेश गुढेकर यांना लोकप्रेरणा पक्षीमित्र गौरव पुरस्कार, सतीश रजनीकांत जाधव यांना लोकप्रेरणा मनोदीप ज्ञानगौरव पुरस्कार, श्रीमती रंजिता विजय ओतारी यांना लोकप्रेरणा नारी शक्ती गौरव पुरस्कार, अनिकेत सुधीर जाधव यांना लोकप्रेरणा युवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

Breaking News

सिंचन भवन: पूर नियंत्रण कक्ष सन 2026 धरण व नद्यांचा पाऊस व पाणीपातळी अहवाल

जलसंपदा विभाग़रत्नागिरी पाटबंधारे मंडळकुवारबाव- रत्नागिरीसिंचन भवन: पूर नियंत्रण कक्ष...

विद्युत मंडळाचा हलगर्जीपणा; पावस येथे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू

विद्युत मंडळाचा हलगर्जीपणा; पावस येथे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूपावस...