सावर्डे : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन व शाश्वत उपजीविकेच्या क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भरीव आणि दूरगामी कार्य करणारे संजिव करपे यांना शिक्षणमहर्षि गोविंदरावजी निकम ‘सह्याद्री पुरस्कार–2026’ जाहीर करण्यात आला आहे. सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे–रत्नागिरी यांच्या वतीने स्व. गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मा. संजीव करपे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे कार्यरत कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (KONBAC) चे मार्गदर्शक संचालक असून, बांबू लागवड ते उत्पादन व विपणनापर्यंतचे एकात्मिक मॉडेल उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या उपक्रमातून हजारो ग्रामीण कारागीर, महिला व युवकांना कौशल्याधारित रोजगार व आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. KONBAC संस्थेची स्थापना 1998 साली त्यांनी श्री. मोहन होडावडेकर यांच्यासह केली असून, या प्रवासात माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेशजी प्रभू यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
JANS Bamboo Products Pvt. Ltd. व Woodygrass या उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील प्रमुख बांबू प्रकल्पांपैकी एक उभा राहताना, भारतीय बांबू उद्योगाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी ओळख मिळाली. भारतासह मालदीव व इतर देशांतील इको-रिसॉर्ट्स, बांबू संरचना, प्री-फॅब्रिकेटेड किट्स आणि पर्यावरणपूरक बांधकामांमुळे शाश्वत पर्यटन व हरित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बांबू उत्पादनाला आंब्यापेक्षा अधिक दर मिळवून देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले.
देश–विदेशातील विविध शासकीय व आंतरराष्ट्रीय सल्लागार समित्यांमध्ये तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका भारतीय बांबू क्षेत्राला धोरणात्मक, तांत्रिक आणि मानांकनाची मजबूत दिशा देणारी ठरली आहे. ग्रामीण विकास, महिलांचे सक्षमीकरण, स्थानिक संसाधनांवर आधारित शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार या मूल्यांशी सुसंगत असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत सह्याद्री शिक्षण संस्था यांच्यावतीने ‘सह्याद्री पुरस्कार–2026’ देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.
त्यांचे कार्य समाज, पर्यावरण आणि राष्ट्राच्या शाश्वत भविष्यासाठी सतत प्रेरणादायी ठरो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे
