🔴शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आमदार किरण सामंत यांचा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम
🔴 लांजा-राजापूर मतदारसंघात ५००० फणस झाडांची लागवड करण्याचा संकल्प
🔴आमदार किरण सामंत यांच्या हस्ते वृक्ष वाटपाला सुरुवात
लांजा (प्रतिनिधी) —
शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनाचे तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघात पर्यावरण संवर्धनाचा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मतदारसंघात तब्बल ५००० फणस झाडांची लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कोकणातील निसर्ग, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या फणस या वृक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. फणस झाडामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यात शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक उत्पन्नाचा आधार मिळू शकतो, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे.
शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने लांजा-राजापूर मतदारसंघातील विविध भागांमध्ये फणस रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थांना फणस झाडांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वृक्ष लागवड ही केवळ औपचारिकता न राहता प्रत्येकाने लावलेल्या झाडाची संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कोकणातील हिरवाई टिकवण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना समृद्ध पर्यावरण देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फणसासारख्या बहुपयोगी झाडांची लागवड ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आमदार किरण सामंत यांच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत होत असून, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे.
“वृक्ष लागवड म्हणजे भविष्यातील पिढीसाठी केलेली गुंतवणूक” या विचारातून लांजा-राजापूर मतदारसंघात ५००० फणस झाडांची लागवड करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
यावेळी माजी शिक्षण सभापती जगदीश राजपकर, राजू कुरूप, गुरुप्रसाद देसाई, दीपक नागले, संदीप दळवी, लांजा सभापती मानसी आंबेकर, राजापूर सभापती नंदिनी कदम, शहरप्रमुख सचिन डोंगरकर जिल्हा परिषद सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
