मुंबई (शांताराम गुडेकर)
करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी श्री.अप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक ( Gold Medal) दि. ११ मार्चचे शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.
वन संपतीचे संरक्षण,संवर्धन व वन विस्ताराचे काम प्रभावी पणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना सर्वोत्तम कार्यासाठी राज्य स्तरावरून पुरस्कार व पदके महाराष्ट्र शासनाकडून दिली जातात.सदर पदक जाहीर करताना शासनाने संबधीत अधिकारी यांचे गोपनीय अहवाल,सचोटी, चारित्र्य,तांत्रिक कार्यक्षमता,बुद्धिमत्ता व नावीन्यपूर्ण कामाचे स्वरूप पाहून राज्यस्तरीय पदक निवड समितीने वन व संरक्षण,वन व्यवस्थापन,वनविस्तार व नावीन्य पूर्ण कामासाठी श्री.अप्पासाहेब निकत भारतीय वन सेवेतील अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार व पदक जाहीर करून गौरवण्यात येणार आहे.
श्री.अप्पासाहेब निकत हे रायगड जिल्ह्यात जिल्हा वन अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ५० लक्ष नवीन वृक्ष लागवड, १ कोटी रोपे निर्मिती, नवीन आधुनिक रोपवाटिका, जैवविविधता वन उद्यान, निसर्ग पर्यटन केंद्र निर्मिती केले. त्याच बरोबर वन प्रचार प्रसिद्धी, वन वणवा रोखणे, समुद्री कासव, गिधाड व दुर्मिळ वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न केले. विविध गुन्ह्यामध्ये वन तस्कर व वन्यजीव तस्कर यांना अटक करून वाहनेही जप्त करून शासन जमा केली. रायगड व रोहा संवर्धन क्षेत्राची नवीन निर्मिती केली.तसेच जंगलात मृद व जल संधारणाची कामे मोठया प्रमाणात करून भूगर्भ जल पातळी वाढविणे आणि वन्य प्राण्यासाठी पाणवठे तयार करुन जल, जंगल व प्राण्यांचे संवर्धनाचे महत्वपूर्ण कार्य केले.
श्री.निकत यांनी “अटल आनंदवन घनवन” हे पुस्तक लिहून वन विस्तारासाठी मोलाचे कार्य केले आहे.या पूर्वीही सन २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने श्री.अप्पासाहेब निकत यांना राज्यस्तरीय रजत पदक देऊन सन्मान केलेला आहे.तसेच विविध संस्थानी श्री.निकत यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.सन मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेल्या राज्यस्तरीय सुवर्णं पदकासाठी विविध स्तरावरून श्री. अप्पासाहेब निकत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.
श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर–
