साखरपा गोरेवाडी येथे एसटी बसची आयशर टेम्पोला धडक; वाहकासह आठ प्रवासी जखमी

0
12

साखरपा गोरेवाडी येथे एसटी बसची आयशर टेम्पोला धडक; वाहकासह आठ प्रवासी जखमी

साखरपा भरत माने

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर साखरपा येथील गोरेवाडी स्टॉपसमोर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि आयशर टेम्पो यांच्यात अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा वाहक आणि आठ प्रवासी असे एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव-लांजा मार्गावर धावणारी एसटी बस (क्रमांक MH 14 MH 4835) लांजाच्या दिशेने जात होती. यावेळी गोरेवाडी स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला (क्रमांक MH 07 AJ 6558) एसटी बसने मागील उजव्या बाजूस जोरदार धडक दिली.
आयशर टेम्पोचालक विलास रामचंद्र बोभाटे (रा. तोंडवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हे कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, आयशरच्या पुढील डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले होते. त्याचवेळी एसटी बसचालक जितेंद्र संभाजी पाटील (लांजा एसटी डेपो) यांच्या ताब्यातील बसने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला मागील उजव्या बाजूस धडक दिली.
या अपघातात एसटी बस वाहक रोकडेश्वर पिराजी तोटेवाड (रा. लांजा) यांच्यासह आठ प्रवाशांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने मदतकार्य करत साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातामुळे महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून पूर्ववत केली.
साखरपा दूरक्षेत्रातील पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली आणि महामार्गावरील वाहतूक लवकरच सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here