सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे महाराष्ट्राचे थोर क्रीडावीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार वारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी चालू शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पृथ्वी राजभर, हुमेरा सय्यद, इच्छा राजभर, यश सावंत, आरोही पालखडे व समर्थ घाणेकर या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून विद्यालयात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २९ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. प्राविण्यक्रम प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी क्रीडाशिक्षक रोहित गमरे यांनी आपल्या भाषणात खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आढावा घेतला. फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सराव करत ऑलिंपिकपर्यंत मजल मारणारे खाशाबा जाधव पुढे पोलीस दलात सहाय्यक आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी अनेक कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला, असेही गमरे सरांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, प्रशांत सकपाळ व रोहित गमरे यांनी केले. उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
