रत्नागिरीसावर्डे विद्यालयात शारीरिक, मानसिक व भावनिक समुपदेशन शिबिर संपन्न

सावर्डे विद्यालयात शारीरिक, मानसिक व भावनिक समुपदेशन शिबिर संपन्न

सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच शालेय विद्यार्थ्यांसाठी “शारीरिक, मानसिक आणि भावनिक समुपदेशन” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा तसेच त्यांच्या विविध अडचणींवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या समुपदेशन शिबिरासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. स्वाती सोनवणे तसेच तज्ञ डॉक्टर डॉ. चैतन्य म्हस्के प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बदलत्या वयानुसार विद्यार्थ्यांमध्ये होणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल, अभ्यासाचा ताण, पालकांशी नाते, सामाजिक दबाव तसेच करिअर निवडीसंदर्भातील संभ्रम यावर त्यांनी सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना तज्ञांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

या समुपदेशन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होऊन मानसिक आरोग्य जपण्याबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले.

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अमृत कडगावे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Breaking News