रत्नागिरीसुसज्ज अंगणवाडी – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी; फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनच्या...

सुसज्ज अंगणवाडी – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी; फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढाकारातून चार अंगणवाड्यांचे लोकार्पण

सुसज्ज अंगणवाडी – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी; फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढाकारातून चार अंगणवाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी, : फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, आनंददायी, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीतील ग्रामीण भागात अंगणवाडी नूतनीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आज रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि कोळंबे परिसरातील चार नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये गोळप मोहल्ला (उर्दू माध्यम) अंगणवाडी, कोळंबे मधील वाकीवाडी, मांडवकरवाडी आणि गोरीवलेवाडी या अंगणवाड्यांचा समावेश आहे.

या अंगणवाड्यांमध्ये इमारतीची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण, आकर्षक रंगकाम, बालकांना ज्ञानवर्धक माहिती देणाऱ्या बोलक्या भिंती तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आनंददायी आणि शिक्षणास पोषक वातावरण मिळणार आहे.
यासोबतच गोळप –दाभिळवाडी आणि कोळंबे–बागवाडी येथील आणखी दोन अंगणवाड्यांचे नूतनीकरणाचे काम तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे.

रत्नागिरी परिसरात या उपक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत आतापर्यंत एकूण १७ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून त्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वी फणसोप, रनपार, गोळप , पावस आणि कोळंबे परिसरातील १३ अंगणवाड्यांचे नूतनीकरण करून त्या बालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बालविकासाची पायाभरणी अंगणवाडीतूनच होत असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्या आणि आवश्यक दुरुस्तीची गरज असलेल्या अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्यात येत आहे. स्वच्छ व सुंदर परिसर, सुधारित पायाभूत सुविधा, आकर्षक बोलक्या भिंती आणि बालमैत्रीपूर्ण वातावरण यामुळे बालकांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली मुकुल माधव फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. समाजातील विविध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. अंगणवाडी नूतनीकरण प्रकल्प हा फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण भाग असून, स्थानिक समुदाय आणि पालकांकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, बालकांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मिळणारे योग्य आणि पोषक वातावरण त्यांच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया घडवते. सुरक्षित, स्वच्छ, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळते. त्यामुळे अंगणवाडी नूतनीकरणासारखे उपक्रम ग्रामीण भागातील बालशिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

या कार्यक्रमास आकाशवाणी रत्नागिरी–सिंधुदुर्गचे स्टेशन डायरेक्टर डॉ. सुनील गायकवाड , कार्यक्रम अधिकारी श्री. विवेक वानखेडे , श्री. सुहास नंदुरे (आकाशवाणी, रत्नागिरी), बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. केदार चव्हाण व श्री. संदीप पाटील , ॲड. गौरव महाजनी व ॲड. रुची महाजनी , तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. रामबाबू संका, श्री. सागर चिवटे, श्री. नंदकुमार शिंपी, श्री. अमित घोरपडे व श्री. आशिष आठवले उपस्थित होते.
यावेळी स्थानिक सरपंच, अंगणवाडी सेविका, पालक, ग्रामस्थ तसेच मुकुल माधव फाऊंडेशनचे श्री. शुभम भेगडे ,श्री. शामराव निंबाळकर आणि श्री. वरद गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Breaking News

गणेशोत्सव  शांततेत साजरा करावा. जिल्हाधिकारी मनुज जिंदल..

गणेशोत्सव  शांततेत साजरा करावा. जिल्हाधिकारी मनुज जिंदल.. रत्नागिरी- (वार्ताहर). ...