सेवा संकल्प अभियानांतर्गत स्थानिक व्यावसायिकाला भेट
रत्नागिरी वार्ताहर : एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, धनजीनाका, रत्नागिरी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी स्थानिक व्यावसायिकाच्या व्यवसायाला भेट दिली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘Aarzo Creations’ या लघुउद्योगाला भेट दिली. या व्यवसायामध्ये मण्यांचा वापर करून विविध सुंदर व आकर्षक वस्तू तयार केल्या जातात. यामध्ये पर्स, मोबाईल चार्म्स, सजावटीच्या वस्तू तसेच विविध प्रकारच्या हँगिंग्जचा समावेश आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मण्यांपासून विविध वस्तू तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेतली. सुंदर कलाकुसर आणि आकर्षक वस्तू पाहून विद्यार्थी खूप उत्साहित झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लघुउद्योगाचे महत्त्व, व्यवसायासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, सर्जनशीलता आणि स्वयंरोजगाराच्या संधी यांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारून व्यवसायाची माहिती जाणून घेतली.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. तसेच लघुउद्योग, उद्योजकता, मेहनत आणि कौशल्य यांच्या महत्त्वाची जाणीव झाली.
या उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. नोमन नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकिब काझी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली आणि त्यांच्यामध्ये सर्जनशीलता व उद्योजकतेविषयी आवड निर्माण झाली.
