विदुला मुळ्येला ‘रौप्यपदक’ तर हर्ष नागवेकरला ‘संगीत’ पारितोषिक; पटवर्धन हायस्कूलच्या चमूचे यश
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या ‘धोंड’ या नाटकाने आपल्या दर्जेदार सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत दोन महत्त्वपूर्ण पारितोषिकांना गवसणी घातली आहे.
वैयक्तिक यशाची मोहोर
या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी विदुला जितेंद्र मुळ्ये ही तिच्या कसदार अभिनयासाठी ‘उत्कृष्ट अभिनय रौप्य पदकाची’ मानकरी ठरली. तसेच, नाटकाला लाभलेल्या प्रभावी संगीतासाठी माजी विद्यार्थी हर्ष नागवेकर याला ‘संगीत दिग्दर्शन: द्वितीय पारितोषिक’ प्राप्त झाले आहे.
पडद्यामागचे कल्पक तंत्रज्ञ व कलाकार
लेखक योगेश कदम यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला शहबाज गोलंदाज यांनी दिग्दर्शित केले. नाटकाच्या यशस्वीतेत खालील तंत्रज्ञांचा मोठा वाटा आहे:
- निर्माती: जानकी घाटविलकर (मुख्याध्यापिका)
- वेषभूषा: गायत्री मांगले सहाय्यक: श्रद्धा शेट्ये
- रंगभूषा: नरेश पांचाळ, सागर सकपाळ
- प्रकाश योजना: साई शिरसेकर आणि अजिंक्य केसरकर
- नेपथ्य: निरंजन दीपक सागवेकर सहाय्यक: सुभाष भोंबल
- पार्श्वसंगीत: हर्ष नागवेकर सहाय्यक: श्री. जयेश गुरव
रंगमंचावरील बालकलाकार: विदुला मुळ्ये (आजी), विभा कडव (श्रेया), शांभवी रेमणे (स्वरा), रमा कानविंदे (ईशा), समृद्धी सावंत (श्रवणची ताई), त्वीशा भाटकर (गण्याची आई), हृषिकेश मोंडकर (आजोबा), शौर्य मयेकर (नील), दत्तात्रय नार्वेकर (श्रवण) आणि समर्थ कोळी (गण्या).
मार्गदर्शक व पाठीराखे:
हे बालनाट्य यशस्वी होण्यासाठी पालक प्रतिनिधी दीप्ती कानविंदे, कार्यवाह धनेश रायकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, सुनील तथा दादा वणजू, श्रीकृष्ण दळी आणि विनायक हातखंबकर यांनी मोलाची कामगिरी बजावली व कलाकारांना मार्गदर्शन केले.
मान्यवरांकडून कौतुक:
कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे ५ ते १४ जानेवारी २०२६ या काळात झालेल्या या स्पर्धेत एकूण ४९ प्रयोगांनी सहभाग नोंदवला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी विजेत्या कलाकारांचे व पटवर्धन हायस्कूलचे विशेष अभिनंदन केले आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक जानकी घाटविलकर, उप मुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, कल्पना शिरोळकर, वर्षा जोशी तसेच सर्व पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
