कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भव्य दिंडी सोहळा संपन्न
दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, बँड-पथक, विठ्ठल नामाचा जयघोष
दादर फुल मार्केट येथून सुरू झालेली ही दिंडी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दिंडी सोहळ्याची सांगता
मुंबई(शांताराम गुडेकर )
संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीनिमित्त दादर येथे भव्य दिंडी सोहळा पार पडला.सोहळ्याचे हे सोळावे वर्ष असून दिंडी सोहळा स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून दिंडीचे प्रस्थान होऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
मुंबईत नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त व्यस्त असलेल्या आणि पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांना मुंबईतच भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या नामस्मरणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.गेली पंधरा वर्षे ही परंपरा उत्साहात सुरू असून, यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, बँड-पथक, विठ्ठल नामाचा जयघोष आणि जागोजागी काढण्यात येणाऱ्या आकर्षक रांगोळ्या हे विशेष आकर्षण ठरले. दादर फुल मार्केट येथून सुरू झालेली ही दिंडी सेनापती बापट मार्ग, दादर फुल मार्केट परिसर, रेल्वे स्थानक परिसर, कबुतरखाना, एन.सी.केळकर रोड, रानडे रोड मार्गे डी. एल. वैद्य रोडवरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पोहचली.तेथे दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेल परिसरात झालेला रिंगण सोहळा हे या दिंडीचे विशेष आकर्षण होते.या रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.मार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार व प्रसादाचे वाटपही करण्यात आले.या सोहळ्यामध्ये दादर फुल मार्केटमधील व्यापारी, फुलविक्रेते, वारकरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम असलेला हा दिंडी सोहळा दरवर्षी दादरकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.या भक्तिमय सोहळ्यात सर्व विठ्ठलभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्तिकी एकादशीचा आनंद घेतला असे संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने सांगण्यात आले
