क्रीडा भारतीतर्फे क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण व महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

0
5

क्रीडा भारतीतर्फे क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण व महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न–

👉🏻चिपळूण– क्रीडा भारती कोकण प्रांत, जिल्हा रत्नागिरी व चिपळूण यांच्या वतीने आयोजित क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण समारंभ व महिला सन्मान पुरस्कार सोहळा नुकताच चिपळूण येथील माधवबाग येथे पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्त्या म्हणून धनश्री गोखले यांनी मार्गदर्शन केले.
क्रीडा ज्ञान परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या आर्या जोगळे, रोहित गुप्ता आणि अदिती शेंडगे यांचा, द्वितीय क्रमांक तेजस्विनी गोखले यांचा, तर तृतीय क्रमांक प्राप्त रितेश जड्याळ, प्रतीक्षा पानवलकर आणि रिया पाष्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्त्या धनश्री गोखले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना केवळ खेळाचा नियमित सराव करणे पुरेसे नसून, आपल्या खेळाविषयी सखोल ज्ञान आत्मसात करणेही तितकेच आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर आपल्या आवडत्या खेळामध्ये तसेच संपूर्ण क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींची माहिती खेळाडूंनी सतत ठेवली पाहिजे. त्याचबरोबर उत्तम कामगिरीसाठी शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी खेळाडूंनी विशेष मेहनत घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

प्रमुख अतिथी श्रीकांत पराडकर यांनी आपल्या मनोगतातून आधुनिक क्रीडा प्रशिक्षणामध्ये स्पोर्ट्स सायन्सचे महत्त्व अधोरेखित केले. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी स्पोर्ट्स सायन्सच्या विविध पैलूंवर काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये खेळाडूंच्या कामगिरीनुसार आहारविषयक मार्गदर्शन, खेळादरम्यान होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शन तसेच खेळाडूंमध्ये विजेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक मानसिकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळाडूंनी केवळ शारीरिक क्षमतेवर अवलंबून न राहता योग्य आहार, दुखापत प्रतिबंध, मानसिक कणखरता आणि शास्त्रीय प्रशिक्षण यांची सांगड घालणे आवश्यक आहे. या आधुनिक प्रशिक्षण पद्धतींचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स सायन्स सेंटरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही श्री. पराडकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये क्रीडा भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा प्रशिक्षक प्रमुख सोनाली वऱ्हाडे, सिद्धेश लाड आणि प्रमुख वक्त्या धनश्री गोखले यांच्यासह क्रीडाप्रेमी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात महिला सक्षमीकरण आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने निशा आंबेकर, रमा करमरकर आणि तन्वी रेडीज यांना विशेष महिला सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच दुर्गामाता दौडमध्ये सशस्त्र स्वरूपात सहभागी झालेल्या अनन्या टोणे आणि मीरा तांबे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here