गुंतागुंतीच्या पाठीच्या कण्याच्या ट्युमरच्या शस्त्रक्रियेनंतर व्हीलचेअरवर असलेला रुग्ण अवघ्या काही दिवसांत लागला चालु–वालावलकर रुग्णालयाचे चमत्कारिक यश

0
3

गुंतागुंतीच्या पाठीच्या कण्याच्या ट्युमरच्या शस्त्रक्रियेनंतर व्हीलचेअरवर असलेला रुग्ण अवघ्या काही दिवसांत लागला चालु–
वालावलकर रुग्णालयाचे चमत्कारिक यश–

👉🏻चिपळूण, चालण्याची क्षमता पूर्णपणे गमावलेल्या महाड येथील ४२ वर्षीय रुग्णाने उच्च जोखमीच्या पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेनंतर आपली चालण्याची क्षमतेची पुनर्प्राप्ती केली आहे.
गंभीर स्वरूपाचा ट्युमर काढून टाकल्यानंतर अवघ्या चार दिवसांत हा रुग्ण वॉकरच्या सहाय्याने स्वतंत्रपणे चालू लागला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णाला दोन्ही पायांमध्ये हळूहळू वाढत जाणारा अशक्तपणा जाणवत होता. आजार झपाट्याने वाढल्याने रुग्ण पूर्णपणे व्हीलचेअरवर आला होता आणि दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहत होता. सखोल तपासणीनंतर पाठीच्या कण्याच्या D8-D9 या पातळीवर गुंतागुंतीचा ट्युमर असल्याचे आणि त्यामुळे पाठीच्या कण्यावर (स्पायनल कॉर्ड) गंभीर दाब पडल्याचे निदान झाले.
सुमारे ४ तासांपेक्षा अधिक काळ चाललेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मेंदू व मणका शल्यचिकित्सक डॉ. मृदुल भाटजीवाले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. ऋषिकेश आणि डॉ. निवेदिता यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ भूलतज्ज्ञ पथकाचे या शस्त्रक्रियेस मोलाचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेची सुरक्षितता वाढविण्यासाठी अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह न्यूरोमॉनिटरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर लगेचच रुग्णाच्या पायांमध्ये हालचाल सुरू झाली. अवघ्या ३ ते ४ दिवसांतच रुग्णाने पायांमध्ये पुरेशी ताकद मिळवत वॉकरच्या सहाय्याने उभे राहून चालण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही संपूर्ण शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत करण्यात आली. या यशामुळे कोकण पट्ट्यातील गुंतागुंतीच्या मेंदू, मज्जासंस्था आणि मणक्याच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालय आशेचा नवा किरण ठरले आहे. तसेच, कोकणातही आता तज्ज्ञ शल्यचिकित्सक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.
चौकट : याबाबत १० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले डॉ. भाटजीवाले म्हणाले, “आधीच कमकुवत झालेल्या स्पायनल कॉर्डसह, पाठीच्या कण्याच्या पृष्ठीय भागातील ट्युमर काढणे ही अत्यंत जोखमीची आणि नाजूक प्रक्रिया आहे. नाजूक चेतासंस्थेला इजा न होता ट्युमर सुरक्षितपणे काढण्यासाठी अत्यंत काळजी आणि शल्यचिकित्सा कौशल्याची आवश्यकता असते. अशा दुर्मिळ आणि जलद बरे होण्याच्या प्रक्रियेत देवाचा हात दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here