भारतीय परिचर्या परिषदेकडून (INC) बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशासाठी CET ची किमान पात्रता निकष शिथिल करण्यास मान्यता

0
6

भारतीय परिचर्या परिषदेकडून (INC) बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशासाठी CET ची किमान पात्रता निकष शिथिल करण्यास मान्यता

रत्नागिरी – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात भारतीय परिचर्या परिषद (Indian Nursing Council – INC), नवी दिल्ली यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध राज्यांमधील नर्सिंग महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. नर्सिंगच्या रिक्त राहणाऱ्या जागांबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून परिषदेने CET परीक्षेतील किमान पात्रता पर्सेंटाइल निकष शिथिल करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय परिचर्या परिषदेने दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी Notification No. 23 of 2026 (F. No. 1-6/LT/2026-INC) जारी केले आहे. या अधिसूचनेनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Examination – CET) दिलेल्या उमेदवारांना बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या उर्वरित रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी किमान पात्रता पर्सेंटाइल निकष कमी करण्यास भारतीय परिचर्या परिषदेने ना-हरकत दर्शविली आहे.

या निर्णयामुळे CET परीक्षा दिलेल्या परंतु यापूर्वी निश्चित केलेल्या पर्सेंटाइल निकषांमुळे प्रवेशासाठी पात्र ठरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील नर्सिंग महाविद्यालयांमधील रिक्त जागा भरून काढण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, प्रवेश प्रक्रियेदरम्यान बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भातील भारतीय परिचर्या परिषदेने निश्चित केलेल्या इतर सर्व मार्गदर्शक सूचना, प्रवेशाच्या अटी व शर्ती यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशासाठी अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुदतीपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

या निर्णयाचे स्वागत करताना श्री. बाळ माने, व्यवस्थापकीय विश्वस्त, द यश फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी यांनी सांगितले की, भारतीय परिचर्या परिषदेचा हा निर्णय विद्यार्थीहिताचा असून नर्सिंग शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. CET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध होणार असून नर्सिंग शिक्षणातील प्रवेशाच्या संधी वाढण्यास निश्चितच मदत होईल.

तसेच, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र उमेदवारांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित राज्यस्तरीय प्रवेश प्राधिकरणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही श्री. माने यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here