‘माय भारत’ तर्फे निवे येथे ‘युवा संवाद’ उत्साहात

0
10

‘माय भारत’ तर्फे निवे येथे ‘युवा संवाद’ उत्साहात ;

‘नो युवर व्होट’ अभियानांतर्गत १८० विद्यार्थ्यांना मतदानाच्या ताकदीचे धडे-
रत्नागिरी, (जिमाका): लोकशाही प्रक्रियेत देशातील युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढावा आणि भावी पिढीमध्ये मतदानाविषयी सजगता निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘माय भारत रत्नागिरी’ च्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील निवे येथील आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ‘युवा संवाद’ हा विशेष प्रेरणादायी कार्यक्रम दिमाखात पार पडला.
या संवादात ‘युथ आयकॉन’ कमलेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत लोकशाहीतील मताचे अमूल्य सामर्थ्य उलगडून दाखवले.
तरुणांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींशी जोडणे आणि राष्ट्रनिर्मितीच्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात मंथन घडवून आणणे, हा या देशव्यापी उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरातील तब्बल ५०० जिल्ह्यांमध्ये हा ‘युवा संवाद’ आयोजित करण्यात आला असून, नवी दिल्ली येथील ‘माय भारत’ कार्यालयाकडून या सत्रासाठी श्री. सोनवणे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती.
सजग मतदार बनणे हीच देशाची ताकद
या सत्रात ‘नो युवर व्होट’ (आपले मत जाणा) या मुख्य संकल्पनेवर आणि ‘SIR’ या महत्त्वाच्या विषयावर कमलेश सोनवणे यांनी अतिशय सकारात्मक, सहज आणि ऊर्जावान शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एका मताची ताकद काय असू शकते आणि देशाच्या विकासात तरुणाईचे योगदान किती मोलाचे आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
कार्यक्रमात सुमारे १८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाच्या अधिकाराविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांची श्री. सोनवणे यांनी समर्पक उदाहरणे देत शंकांचे निरसन केले.
देशाचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी प्रत्येक तरुणाने जागरूक आणि जबाबदार नागरिक बनणे ही काळाची गरज आहे, हा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here