राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना: अर्ज प्रक्रिया...

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना: अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना: अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून
रत्नागिरी, दि. २५ (जिमाका): राज्य शासनामार्फत सन १९५४-५५ पासून राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने’साठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या १ जुलैपासून सुरू होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र साहित्यिक आणि कलावंतांनी आपले अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन कलाकार मानधन निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषद रत्नागिरीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या योजनेतील लाभार्थी हे संपूर्णपणे कला व साहित्य क्षेत्राशी निगडीत असून, त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून असते. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी कलावंतांना राज्य शासनामार्फत दरमहा रु. ५,०००/- मानधन दिले जाते.
📅 अर्ज करण्याचा कालावधी
सुरुवात: १ जुलै २०२६
अंतिम मुदत: ३१ जुलै २०२६
अर्ज करण्याची लिंक: आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.
📋 अर्ज सादर करण्यासाठी पात्रता निकष
१. वयोमर्यादा: अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयाच्या अटीत १० वर्षांची शिथिलता असून, त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे आहे.
२. क्षेत्रातील अनुभव: कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात सातत्यपूर्ण व दर्जेदार कामगिरी केलेली असावी.
३. उत्पन्न मर्यादा: कलाकाराचे सर्व मार्गांनी मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
४. उपजीविकेचे साधन: ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे किंवा जे पूर्वी कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही, असे कलाकार यास पात्र राहतील.
५. इतर पेन्शन नाही: केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे किंवा इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे कलाकार यास पात्र असणार नाहीत.
६. रहिवासी: कलाकार/साहित्यिक हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
७. प्राधान्य: वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या आणि दिव्यांग कलाकार-साहित्यिकांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल.
📁 अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे
वयाचा दाखला
ओळख व रहिवासी पुरावे (ओळखपत्र, रहिवासी दाखला)
उत्पन्नाचा दाखला
प्रतिज्ञापत्र
बँक तपशील (बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड)
पती व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)
दिव्यांगत्वाचा दाखला (लागू असल्यास)
राज्य/केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)
नामांकित संस्था किंवा व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास)
इतर विविध आवश्यक पुरावे
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पात्र साहित्यिक व कलावंतांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर जाऊन ३१ जुलै २०२६ पूर्वी आपले अर्ज अचूकपणे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Breaking News

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत शिरगांव हद्दीमधील बाणेवाडी आणि सुतारवाडी येथे दोन वनराई बंधारे

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत शिरगांव हद्दीमधील बाणेवाडी आणि सुतारवाडी...

जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न रत्नागिरी जिल्ह्यातील १००...