वसई- विरार महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी सक्तवसुली संचनालयानं 13 ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये वसई विरार महापालिकेचे वास्तुरचनाकार वाय. एस. रेड्डी हेच ईडीच्या रडारवर होते. या छाप्यात 8.6 कोटींची रोकड, 23.25 कोटींचं सोनं आणि हिरेजडीत दागिने जप्त केले असून अनेक कागदपत्रंही ईडीनं ताब्यात घेतली आहेत. वास्तुरचनाकाराच्या घरातून तब्बल 30 कोटीचं घबाड मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
वसई-विरार महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत मीरा-भाईंदर पोलिसांत विविध विकासक आणि स्थानिक नेत्यांविरोधात दाखल एफआयआरवर ईडीनं आपला ईसीआयआर दाखल केला आहे. त्यानुसार ईडीनं विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू केली. वसई विरार महापालिकेचे वास्तुरचनाकार वाय. एस. रेड्डी यांच्या निवासस्थानी ईडीच्या हाती मोठं घबाड लागलं. याशिवाय या छापेमारीत सिताराम गुप्ता, बिल्डर अनिल गुप्ता, यांचा समावेश होता. सलग 8 तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे वसई -विरारमध्ये एकच खळबळ उडाली.
ईडीच्या अधिकार्यांनी सीताराम गुप्ता यांच्या नालासोपाऱ्यातील संतोषभुवन येथील निवासस्थानासह अन्य 13 ठिकाणी छापे टाकले. नालासोपारा येथील अंबावाडी येथील भाजपाचे पदाधिकारी विवेक तिवारी यांच्या निवासस्थानी, बिल्डर अनिल गुप्ता यांच्या कार्यालय, वसई पूर्वेच्या मधूबन मधील राम रहीम अकॉर्ड सोसायटीमधील 701, 702 या सदनिकेतही धाड टाकून तपासणी करण्यात आली आहे. अंबावाडी येथील अपना सहकारी बँकेतही चौकशी करण्यात आली. मात्र, छापेमारी नंतर या प्रकरणाचा माझा काही संबंध नसल्याचं विवेक तिवारी यांनी स्पष्ट केलं. वसई -विरारमध्ये ईडीची धडक कारवाई सुरू झाल्यामुळे येत्या काळात येथे मोठा राजकीय भूकंप होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
…