सावर्डे विद्यालयाची तायक्वांदो स्पर्धेत आगेकूच
खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी; दोन सुवर्णपदकांसह चार रौप्यपदकांची कमाई
सावर्डे : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बांदल हायस्कूल, चिपळूण येथे शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
या स्पर्धेत विद्यालयाचे एकूण ११ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी गंधर्व धने आणि श्रीपाद धुरी यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तसेच समर्थ सोनवणे, अनघा कांबळे, अश्विनी मुरुडकर आणि दर्शन कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक मिळवले.
उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत गंधर्व धने आणि श्रीपाद धुरी यांची आगामी राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी खेळाडूंना सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गंधर्व धने व श्रीपाद धुरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
