सेवा संकल्प अभियानातून आरोग्यसेवेचा जागर; गोठणे-दोनिवडे येथे ४२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी
रत्नागिरी, (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यसेवा व जनजागृतीचा संदेश तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र फुपेरे (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग) आणि अंगणवाडी केंद्र गोठणे-दोनिवडे (महिला व बाल विकास विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी उपकेंद्र गोठणे-दोनिवडे येथे विशेष आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ४२ लाभार्थ्यांनी विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच मुकेश विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी फुपेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. के. एस. देवकत्ते, आरोग्य सहाय्यक एस. आर. कळसकर, पोलीस पाटील सौ. अनुजा झोरे, चिखलगावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक श्री. कुडकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोसले यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी, गरोदर मातांची विशेष तपासणी, बालकांचे लसीकरण तसेच किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले.
महिला व बाल आरोग्यावर विशेष भर देत अंगणवाडी विभागामार्फत पोषण आहार, पूरक पोषण, बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण याविषयी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य आणि वेळेवर लसीकरणाचे महत्त्व याविषयी समुपदेशन करण्यात आले. प्रतिबंधात्मक तपासणी, वेळेवर उपचार आणि प्रबोधन याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानातून आरोग्यसेवेचा जागर; गोठणे-दोनिवडे येथे ४२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी
