आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप; उपस्थितांना अश्रू अनावर!
संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा निखळला आहे. भारतीय संगीत क्षेत्राला आपल्या आवाजाने समृद्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले कायमच्या आपल्यातून निघून गेल्या आहेत.
सोमवारी, १३ एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले राजकीय नेते, सिने-कलाकार आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत वातावरणात प्रचंड शोकाकुल शांतता पसरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी गायक शानने आपल्या सुरांनी आशाताईंना भावपूर्ण निरोप दिला.
आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग खऱ्या अर्थाने संपले आहे. १२ एप्रिलला, रविवारी त्यांचे निधन झाल्यानंतर, सोमवारी (१३ एप्रिल) मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशा भोसलेंचे पार्थिव लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, जिथे संगीत, कला आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांचे शेवटचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे, कुटुंबीय व चाहत्यांच्या उपस्थितीत या महान गायिकेला निरोप देण्यात आला. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्याचबरोबर आमिर खान, विकी कौशल, आशा भोसलेंची बहीण उषा मंगेशकर उपस्थित होत्या. गायक शानने यावेळी गाणे गात आशाताईंना अखेरचा निरोप दिला.
मुंबई पोलिसांनी आशाताईंना मानवंदना दिली. त्यानंतर आशाताईंच्या पार्थिवाला त्यांचे सुपूत्र आनंद भोसले यांनी मुखाग्नी दिला. आशाताईंना शेवटचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
आशा भोसलेंना प्रामुख्याने हृदय आणि श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असली, तरी त्यांनी गायलेली हजारो गाणी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात जिवंत राहतील.
