एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूल, रत्नागिरी येथे ‘दीनियात व उर्दू सप्ताह’ उत्साहात साजरा–
👉एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूल, रत्नागिरी येथे ‘दीनियात व उर्दू सप्ताह’ या विषयावर एक भव्य, शैक्षणिक व उद्देशपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या धार्मिक तसेच साहित्यिक कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले.
कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात इयत्ता सहावीचा विद्यार्थी रियान इम्तियाज होरीकर याने सूरह अद्-दुहाच्या पठणाने केली. त्यानंतर फवाज इम्रान केळकर याने सूरहचा मराठी अनुवाद सादर केला.
त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी अझमीन अजीम होरीकर, फलझा नागलीकर आणि फराह फणसोपकर यांनी आपल्या मधुर आवाजात पैगंबर हजरत मुहम्मद ﷺ यांच्या स्तुतीपर नात सादर करून वातावरण भक्तिमय केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. अशफाक हे नाईक होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना जेद गुहागरकर (इमाम, वाटके मस्जिद) आणि हाफिज जावेद (इमाम, उमर अजिंक्यतारा मस्जिद) उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण ७५ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विविध धार्मिक व साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हम्द, नात, कविता, संवाद, पठणातून काव्य सादरीकरण, अस्माउल हुस्ना, कथाकथन, भाषणे, अॅक्शन साँग्स तसेच उर्दू भाषेचे महत्त्व व उपयुक्तता या विषयांवर विविध आकर्षक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर केले.
या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या तयारीमध्ये दीनियात विभागातील शिक्षक मौलाना मुहम्मद जकी कासमी, मौलाना उसामा हज्जू नदवी आणि फातिमा मॅडम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच उर्दू विभागाच्या कुशल शिक्षिका मा. श्रीमती दिलनवाज मजगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या उर्दू कार्यक्रमाच्या तयारीमध्ये मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी इन्शा झाकीर होरीकर आणि अनम आबिद सोलकर यांनी अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने केले.
प्रमुख पाहुणे मौलाना जेद गुहागरकर आणि हाफिज जावेद यांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. तसेच शाळा प्रशासन व शिक्षकांचे या उद्देशपूर्ण आणि यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. नौमान नाईक यांच्या वतीने कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मौल्यवान बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
दीनियात विभागाचे शिक्षक मौलाना उसामा हज्जू यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आभार मानले. शेवटी हाफिज शब्बीर यांच्या दुआने कार्यक्रमाची सांगता झाली.
