कोकणच्या मातीतील महिलांची जिद्द
‘मावळंग उत्पादक गटा’ची यशोगाथा
👉रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे देवरूख हे गाव निसर्गसंपन्न कोकणात वसलेले आहे. डोंगरदऱ्या आणि मुसळधार पाऊस असलेल्या या भागात शेती हाच उपजीविकेचा मुख्य आधार. पारंपरिक शेतीकडून व्यावसायिक बागायतीकडे वळताना येथील महिलांनी एकत्र येऊन ‘गट’ शक्तीच्या जोरावर आर्थिक क्रांती घडवून आणली आहे.
काही वर्षांपासून हवामानातील बदल आणि काजू पिकासाठी असलेली पोषक स्थिती पाहून गावातील शेतकऱ्यांनी काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. गावात काजूची उपलब्धता भरपूर होती, मात्र वैयक्तिक विक्रीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. व्यापाऱ्यांची अनुपलब्धता आणि वाहतुकीचा वाढता खर्च यामुळे नफा कमी होत होता. या समस्येवर उपाय म्हणून ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत १० महिला शेतकरी एकत्र आल्या आणि १० ऑक्टोबर २०१८ रोजी ‘मावळंग काजू उत्पादक गटा’ ची स्थापना झाली.
गट स्थापनेपूर्वी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वैयक्तिक विक्रीमुळे काजूला योग्य भाव न मिळणे. वाहतुकीचा खर्च जास्त असणे. बाजारपेठेच्या ज्ञानाचा अभाव. शेतीसाठी लागणाऱ्या खतांची वेळेत अनुपलब्धता. उमेद अभियानातील उद्योग सखी, एम-सीआरपी आणि प्रभाग समन्वयक यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांना ‘उत्पादक गट’ निर्मितीचे महत्त्व समजले. एकत्रितपणे काजू गोळा करणे आणि विक्री करणे सुरू केल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी झाला आणि घाऊक विक्रीमुळे व्यापाऱ्यांशी घासाघीस करण्याची ताकद वाढली.
सेंद्रिय शेती आणि खर्च कपात
गटातील महिलांना उमेद अभियानाद्वारे सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले. आज या महिला स्वतःच्या घरीच जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क आणि गांडूळ खत, कंपोस्ट खत तयार करतात. स्वतः सेंद्रिय खते तयार केल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आणि उत्पादनाचा दर्जा सुधारला. या नैसर्गिक पद्धतीमुळे पर्यावरणाचेही रक्षण होत आहे.
केवळ कच्च्या काजूची विक्री न करता, महिलांनी त्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला. काजूची प्रतवारी केल्यामुळे बाजारात उत्कृष्ट भाव मिळत आहे. आकर्षक पॅकेजिंगमुळे ग्राहक या उत्पादनांकडे आकर्षित होत आहेत. बियांवर प्रक्रिया करून काजू गर तयार केल्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढले आहे.
प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ
व्यवसायवाढीसाठी गटाला अभियानाकडून पन्नास हजार रुपये पायाभूत सुविधा निधी आणि १ लाख ५० हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात मिळाले. याव्यतिरिक्त महिलांनी स्वतःचे प्रत्येकी एक हजार रुपये भांडवल गुंतवले. तालुका स्तरावर महिलांनी विपणन सर्वेक्षण, आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योजकता विकासाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले, ज्याचा फायदा प्रत्यक्ष व्यवसाय करताना होत आहे.
प्रगतीचा आलेख आणि आर्थिक उन्नती
गटाची आर्थिक कामगिरी कौतुकास्पद आहे. मागील वर्षाची उलाढाल ४ लाख ५० हजार रुपये असून चालू वर्षाची उलाढाल ६ लाख ५० हजार रुपये (आतापर्यंत) आहे. गेल्या दोन वर्षांत सर्व खर्च वजा जाता ९५ हजार रुपये नफा झाला आहे. प्रत्येक महिलेला मासिक सरासरी पाच हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत आहे. तालुका स्तरावरून तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, प्रभागसंघ व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती, उद्योग सखी, कृषी सखी व स्वयं सहाय्यता समूहातील महिला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
मावळंग काजू उत्पादक गटातील महिलांचा आत्मविश्वास आता उंचावला आहे. गावातील कच्चा माल (काजू, कोकम, आंबा) वापरून भविष्यात स्वतःचे अद्ययावत प्रक्रिया केंद्र (Processing Unit) स्थापन करण्याचा या गटाचा मानस आहे.
धामापूर तर्फे देवरूख येथील या १० महिलांनी हे सिद्ध केले आहे की, योग्य मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि सामूहिक प्रयत्नांची जोड मिळाली, तर ग्रामीण भागातील महिला केवळ घरच नाही तर यशस्वी व्यवसायही सांभाळू शकतात. तालुका अभियान व्यवस्थापन यंत्रणेचे मार्गदर्शन आणि महिलांची जिद्द यामुळे ‘मावळंग गट’ आज इतर महिलांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
– अमृता भातडे-धुंदूर
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
