कोकणवासियांचे स्वप्न साकार! CSMT ते सावंतवाडी दरम्यान आजपासून धावणार नियमित एक्स्प्रेस ट्रेन—
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा–
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रत्यक्ष तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती-
👉मुंबई: कोकण वासीयांसाठी आणि चाकरमान्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते थेट सावंतवाडी रोड दरम्यान बहुप्रतिक्षित नवीन नियमित एक्स्प्रेस ट्रेनचा आजपासून औपचारिक शुभारंभ झाला असून, कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित शानदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला; तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) उपस्थित राहिले आणि त्यांनीही गाडीला हिरवा झेंडा दाखवला. खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना मोठे यश आले असून कोकण वासीयांकडून याचे जल्लोषात स्वागत केले जात आहे.
ही नवीन नियमित सेवा गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या क्रमांकांनी दररोज धावणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असून, यामुळे मुंबई आणि संपूर्ण कोकणातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.
