कोकणातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या नेतृत्वात नवे पर्व
68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; अध्यक्षपदी आमदार शेखर निकम, कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध निकम
सावर्डे (ता. चिपळूण) : कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या 68 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार, दि. 22 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आले. या सभेत संस्थेच्या विद्यमान विश्वस्त मंडळाची मुदत संपत असल्याने पुढील पाच वर्षांसाठी नवीन विश्वस्त मंडळाची निवड एकमताने करण्यात आली. तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडही सर्वानुमते करण्यात आली.
सभेत चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. शेखर गोविंदराव निकम यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी डॉ. इसाक महंमद खतीब, सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के आणि श्री. प्रशांत गोविंदराव निकम यांची निवड करण्यात आली.
विश्वस्त मंडळात श्री. मारुती आत्माराम घाग, श्री. चंद्रकांत भाऊराव सुर्वे, श्री. शांताराम परशुराम खानविलकर, श्री. महेश मनोहर महाडिक, श्री. मानसिंग श्रीराम महाडिक आणि श्रीम. आकांक्षा बाळकृष्ण पवार यांची फेरनिवड करण्यात आली. तर श्री. गुलाब नारायण सुर्वे, श्री. अनिरुद्ध शेखर निकम आणि श्री. हरिश्चंद्र (बाबू) सुर्वे यांची नव्याने विश्वस्त म्हणून निवड झाली.
यानंतर सोमवार, दि. 23 मार्च 2026 रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पुढील कामकाजासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये युवा नेतृत्व व उच्च शिक्षित श्री. अनिरुद्ध शेखर निकम यांची कार्याध्यक्षपदी, तर श्री. महेश मनोहर महाडिक यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे ही कोकणातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेची स्थापना स्वर्गीय गोविंदराव शावजी निकम यांनी सन 1957 मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अवघ्या 22 व्या वर्षी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून संस्थेची पायाभरणी करण्यात आली.
गेल्या जवळपास 69 वर्षांपासून संस्था शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असून हजारो विद्यार्थी घडवून समाजाच्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. या संस्थेने कोकणातील ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
संस्थेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गेल्या तब्बल 68 वर्षांपासून संस्थेतील सर्व निवडणुका बिनविरोध होत आल्या आहेत. आजच्या स्पर्धात्मक व मतभेदांनी भरलेल्या काळातही ही परंपरा अखंड टिकून राहणे हे संस्थेच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता, एकात्मता आणि सदस्यांमधील परस्पर विश्वासाचे द्योतक मानले जाते.
संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव शावजी निकम यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच एकोप्याला, समन्वयाला आणि सहकार्याला प्राधान्य दिले. “संस्थेच्या प्रगतीसाठी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करावे,” हा त्यांचा विचार आजही संस्थेच्या कार्यपद्धतीत प्रतिबिंबित होताना दिसतो. याच विचारधारेतून संस्थेतील पदाधिकारी व सदस्यांनी संस्थेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत परस्पर समन्वय राखला आहे.
याच पार्श्वभूमीवर संस्थेतील पदाधिकारी व विश्वस्तांची निवड चर्चा, सहमती आणि एकमताच्या वातावरणातून केली जाते. त्यामुळे निवडणुकीत स्पर्धा, गटबाजी किंवा मतभेद निर्माण होण्याऐवजी संस्थेच्या विकासासाठी योग्य व्यक्तींची निवड सर्वांच्या सहमतीने केली जाते. यामुळे संस्थेचे कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि एकदिलाने पुढे नेले जाते.
ही बिनविरोध निवडीची परंपरा केवळ संस्थेतील एकोप्याचे प्रतीक नसून कोकणातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श मानली जाते. संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली निष्ठा, समर्पण आणि संस्थेच्या ध्येयाशी असलेली बांधिलकी यामुळेच ही परंपरा आजतागायत अखंडपणे टिकून आहे.
नवीन पदाधिकारी व विश्वस्त मंडळाच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल, तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात संस्था नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांचे अभिनंदन करताना सह्याद्री शिक्षण संस्थेचे सन्माननीय विश्वस्त
कोकणातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या नेतृत्वात नवे पर्व68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
