क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त खेड पंचायत समितीत लाभार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी, (जिमाका) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ अंतर्गत पंचायत समिती, खेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांतील आदिवासी लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील तसेच विजय करपे उपस्थित होते.
लाभार्थ्यांचा गौरव व योजनांची माहिती
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्प आणि सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नोडल अधिकारी यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आणि रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
विचारांचा जागर व समाजविकासाचा संकल्प
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी दिलेला लढा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विकासात्मक योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निकम, श्री. पवार यांच्यासह रत्नागिरी समितीचे सर्व सदस्य व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
