‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमातून ८० कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश; फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, प्रेम आणि आपुलकीचा सण! या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, या संवेदनशील भावनेतून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ (Give With Dignity – GWD 2026) या सामाजिक उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील विविध ठिकाणी एकूण ८० दिवाळी किराणा साहित्याचे किट वितरण करून गरजू कुटुंबे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पोहोचविण्यात आला.
मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त रितू छाब्रिया यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा सामाजिक उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून, प्रत्येक लाभार्थ्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्याचा एक संवेदनशील प्रयत्न आहे. ‘Give With Dignity’ अर्थात ‘सन्मानपूर्वक मदत, स्वाभिमानाला बळ’ या उदात्त विचारातून साकारलेल्या या उपक्रमाद्वारे गरजू व्यक्तींना मदतीचा हात देतानाच त्यांना समाजाचा अभिन्न घटक असल्याची जाणीव करून दिली जाते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि समावेशकतेचा आदर्श निर्माण केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे कार्यरत असलेल्या ६३ कंत्राटी स्वच्छता व हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना दिवाळी किराणा साहित्याचे किट वितरण करण्यात आले. रुग्णालयातील स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वितरण कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश असोरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. शैलेश गावंडे, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्लांट हेड (ECF) श्री. नामदेव देशमुख, प्लांट एचआर प्रमुख श्री. नंदकिशोर शिंपी, फॅक्टरी मेडिकल ऑफिसर डॉ. अनूप करमळकर, तसेच मुकुल माधव फाउंडेशनचे CSR अधिकारी श्री. शामराव निंबाळकर आणि CSR एक्झिक्युटिव्ह श्री. वरद गोरे उपस्थित होते.
याशिवाय, राहाटघर येथील गोसावी वस्तीमध्ये गेल्या सुमारे २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आणि भंगार संकलन व पुनर्वापराच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू कुटुंबांना तसेच मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरातील सेवालाल वस्तीमध्ये मासेमारी आणि बांधकाम क्षेत्रातील मजुरीवर अवलंबून असलेल्या गरजू कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वितरण करण्यात आले.
तसेच, भाट्ये ग्रामपंचायतीअंतर्गत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता व परिसराचे आरोग्य राखण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी किराणा किट वितरित करून त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
प्रत्येक किराणा दिवाळी किट मध्ये तांदूळ, गहू पीठ, विविध डाळी, तूप, साखर, मीठ, मसाले, चहा, बिस्किटे, साबण यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह दिवाळीचा प्रकाश आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या पारंपरिक पणत्यांचा समावेश करण्यात आला होता.
या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सणासुदीच्या काळात आपलीही आठवण ठेवून आपुलकीने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल लाभार्थ्यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
‘गिव्ह विथ डिग्निटी’ हा केवळ किराणा किट वितरणाचा उपक्रम नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि आनंदाने सण साजरा करण्याची संधी मिळावी, या विचाराला कृतीत उतरविणारा उपक्रम आहे. समाजाच्या स्वच्छतेसाठी आणि सेवेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांच्या आनंदात सहभागी होणे, ही या उपक्रमाची खरी ओळख आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकी, संवेदनशीलता आणि समानतेचा संदेश देत दिवाळीचा आनंद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न केला आहे.
कारण, खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश तेव्हाच उजळतो, जेव्हा आनंदाची एक पणती दुसऱ्याच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण करते !
