गुहागर: पाटपन्हाळे येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान ; कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश–
रत्नागिरी, (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान – सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि तालुका सहकारी अधिकारी (श्रेणी-१) कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाटपन्हाळे हायस्कूल परिसर व शृंगारतळी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
झालेल्या या कार्यक्रमात प्लास्टिक कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि प्लास्टिकमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांना प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम, त्याचे योग्य वर्गीकरण व कंपोस्टिंगचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच प्लास्टिकच्या वापरावर आळा घालण्यासाठी पाटपन्हाळे वि. का. सेवा सहकारी संस्थेच्यावतीने विद्यार्थी व नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान पाटपन्हाळे परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले आणि पुढील विल्हेवाटीसाठी तो पाटपन्हाळे ग्रामपंचायत कचरा गाडीमध्ये सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमास पाटपन्हाळे विकास संस्थेचे चेअरमन, संचालक, सभासद, शृंगारतळी येथील नागरिक, गुहागर तालुक्यातील सहकारी संस्थांचे सचिव, पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी, तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि लेखापरीक्षक उपस्थित होते. या संपूर्ण अभियानात सुमारे ७० हून अधिक जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला, अशी माहिती तालुका सहकारी अधिकारी (श्रेणी-१) प्रियांका माने यांनी दिली आहे.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
