Home रत्नागिरी चिपळूणच्या निशा आंबेकर यांची राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत सुवर्णझळाळी कामगिरी

चिपळूणच्या निशा आंबेकर यांची राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत सुवर्णझळाळी कामगिरी

0
चिपळूणच्या निशा आंबेकर यांची राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत सुवर्णझळाळी कामगिरी

  युनायटेड मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दि. 26 ते 30 जानेवारी दरम्यान मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत चिपळूणच्या खेळाडू एस. आर. सुवर्णकन्या निशा आंबेकर यांनी दैदीप्यमान कामगिरी करत तब्बल 6 सुवर्णपदके पटकावली.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून खेळाडू सहभागी झाले होते. 80 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत आपले कौशल्य सादर केले. ऍथलेटिक्स थ्रोईंग, पोहणे, बॅडमिंटन, लांब उडी, उंच उडी, पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल आदी क्रीडाप्रकारांचा या स्पर्धेत समावेश होता. यामधील स्विमिंग स्पर्धा वीर सावरकर जलतरण तलाव येथे पार पडल्या.
45+ वयोगटात सहभागी झालेल्या निशा आंबेकर यांनी थाळीफेक, गोळाफेक, हॅमर थ्रो तसेच 50 मीटर, 100 मीटर आणि 200 मीटर फ्री-स्टाईल पोहणे या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण सहा सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. तसेच कबड्डी स्पर्धेत रौप्य पदक मिळवत त्यांनी आपल्या यशात भर घातली.
या स्पर्धेत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल क्रीडाप्रेमी, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय निशा आंबेकर यांनी आपले यजमान गजानन आंबेकर, कुटुंबीय तसेच सर्व मित्र-मैत्रिणींना दिले आहे.
चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या निशा आंबेकर यांची ही कामगिरी अनेक महिला व ज्येष्ठ खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here