चिपळूणमध्ये ६ कोटी ८३ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन
चिपळूण: चिपळूण विधानसभा मतदारसंघातील रस्ते आणि पुलांच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या विशेष पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या ६ कोटी ८३ लाख रुपये खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले*.
अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत मंजूर झालेल्या या कामांचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला असून, यामुळे चिपळूणच्या शहरी व ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या विकासकामांच्या मालिकेची सुरुवात सकाळी चिपळूण–गुहागर बायपास रोडच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनाने झाली.
या मार्गावरील दररोजची मोठी वाहतूक लक्षात घेता रस्त्याच्या सुधारणेसाठी १ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या कामामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतरपिंपळी–नांदिवसे रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ९२ लाख रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होऊन स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. दुपारच्या सत्रात पेढांबे येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ करण्यात आला. तब्बल ४ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित होणार असून, नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्णत्वास जात आहे.
केवळ विकासकामांना निधी मंजूर करून न थांबता ती प्रत्यक्ष जमिनीवर मार्गी लागावीत, यासाठी आमदार शेखर निकम सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
या भूमिपूजन समारंभास सभापती सूर्यकांत खेतले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते दादा साळवी, उपसभापती संदेश आयरे, भाजपा गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, अंजली कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलींद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, भाजपा चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेविका राणी महाडिक, रुही खेडेकर, नरेंद्र बेलवलकर, रियाज खेरटकर, सचिन भोसले, सचिन पाटेकर, सलीम पालोजी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, माजी सभापती शौकत मुकादम, पांडुरंग माळी, स्वप्नील शिंदे, दिशा दाभोळकर, डॉ. रेहमत जबले, रविना गुजर, पूनम भोजने, दिनेश शिंदे, ठेकेदार गणेश कांबळे, रोहित कांबळे, माजी नगरसेवक तथा ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर, ॲडव्होकेट अमित कदम, नगरसेवक योगेश पवार आणि इम्रान कोंडकरी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तीनही महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे चिपळूणच्या विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
