दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जिल्ह्यात जनजागृतीचा जागर

0
4

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जिल्ह्यात जनजागृतीचा जागर
विद्यार्थी आणि नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे आवाहन; व्याख्याने, वक्तृत्व-वादविवाद स्पर्धा व माहिती पत्रकांचे वाटप
रत्नागिरी,  (जिमाका): भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आणि नागरिकांमध्ये पारदर्शकतेबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), रत्नागिरी घटकाच्या वतीने जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२६’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा सप्ताह राबवला जात असून, या अंतर्गत शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवून भ्रष्टाचार निर्मूलनाचा जागर केला जात आहे.
शहरातील नवनिर्माण कॉलेज येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील आणि पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांच्या उपस्थितीत वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात तरुणांची भूमिका मांडली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य गवळे, सांस्कृतिक विभागप्रमुख ताराचंद ढोबळे, प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
खेडमध्ये विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांशी संवाद
खेड येथील ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांचे भ्रष्टाचार निर्मूलनावर विशेष व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर झालेल्या चर्चासत्रात त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड येथील सभागृहात पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र आणि ग्रामस्थांसाठी व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
शासकीय कार्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी जनजागृती
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राहावी व नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी, यासाठी खेड व रत्नागिरी परिसरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. खेड येथील तहसीलदार कार्यालय, पुरवठा शाखा, भूमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती, खेड बसस्थानक तसेच रत्नागिरीतील एमएसईबी कार्यालय, एसटी महामंडळ, माळनाका पेट्रोल पंप आणि बाजारपेठ परिसरात प्रबोधनात्मक भित्तीपत्रके (पोस्टर्स) लावण्यात आली. याशिवाय नागरिकांना माहितीपत्रकांचे (हँडबिल्स) थेट वाटप करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली.
माध्यमांद्वारे व्यापक प्रसार
तळागाळातील घटकांपर्यंत हा संदेश पोहोचावा यासाठी स्थानिक वृत्तपत्रे, आर. के. केबल नेटवर्क, आकाशवाणी तसेच व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल बॅनर्सद्वारे जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here