दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम

0
7

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम; विद्यार्थ्यांचा गौरव
रत्नागिरी, (जिमाका) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात प्रबोधनपर विविध व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, तसेच पथनाट्यांचे आयोजन करून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
दापोलीत पोलीस पाटील व नागरिकांना मार्गदर्शन
तहसीलदार कार्यालय दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी उपस्थित पोलीस पाटील व नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यालय परिसरात दर्शनी भागात भित्तीपत्रके लावून उपस्थितांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दापोली बसस्थानक येथे प्रवाशांना व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती देणारी पत्रके वाटून जागृती करण्यात आली.
शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आणि गुणगौरव
विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण व्हावी यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते :

  • कसबा (संगमेश्वर) : न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली असून, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
  • सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
  • रत्नागिरी : श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील विजेत्यांना तसेच रत्नागिरी एसटी बसस्थानक व मंगळवार आठवडा बाजार येथे भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीपर पथनाट्य सादर करणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
    “ज्ञानाबरोबर नैतिक मूल्ये जोपासली तरच तुम्ही खरे पदवीधर” – पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील
    विधी महाविद्यालयातील बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील म्हणाले, “शिक्षणात मिळवलेल्या ज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनात व भविष्यातील कारकिर्दीत नैतिक मूल्यांचा प्रत्यक्ष वापर केला, तरच तुम्ही समाजाचे खरे पदवीधर ठराल.” याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य बर्वे यांनीही भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी तरुणांची भूमिका अधोरेखित करत आपले मनोगत व्यक्त केले.
    माध्यमांतून व्यापक प्रसार
    जनजागृती सप्ताहादरम्यान स्थानिक वृत्तपत्रे, केबल टीव्ही, आकाशवाणी तसेच व्हॉट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी संदेश सर्वदूर पोहोचवण्यात आले. वृत्तपत्रांसोबत जनजागृती पत्रकांचे वाटप करून नागरिकांना कोणत्याही भ्रष्टाचाराविरुद्ध पुढे येण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here