नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने जाणून घेत समान नागरी संहिता समितीची जनसुनावणी संपन्न–
ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिकांशी समितीचा संवाद—
कोकण विभागातील सात जिल्ह्यांतील जनसुनावणी प्रक्रिया पूर्ण–
विविध सामाजिक घटकांच्या भावना आणि दृष्टिकोन जाणून घेण्यावर समितीने दिला भर–
👉🏻नवी मुंबई,- (विमाका) :- समान नागरी संहितेसारख्या व्यापक आणि संवेदनशील विषयाचा विचार करताना केवळ कायदेशीर तरतुदींचा अभ्यास पुरेसा नसून, त्याच्याशी संबंधित समाजातील विविध घटकांचे अनुभव, भावना आणि सामाजिक वास्तव जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून समान नागरी संहिता समितीने जनसुनावणीदरम्यान नागरिकांची मते, अनुभव आणि भूमिका जाणून घेतल्या. नागरिकांना कोणताही संकोच न बाळगता आपले विचार मांडता यावेत, त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे आणि प्रत्येक घटकाचा दृष्टिकोन समजून घेतला जावा, यावर समितीने भर दिला. नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेणे आणि त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचा विचार करणे, हा या जनसुनावणी प्रक्रियेचा महत्त्वाचा दृष्टिकोन राहिला.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जनसुनावणीच्या दुसऱ्या दिवशी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील नागरिकांची मते समितीने जाणून घेतली. यापूर्वी पहिल्या दिवशी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील जनसुनावणी पार पडली होती.
यावेळी जनसुनावणी समितीचे सदस्य यावेळी जनसुनावणी समितीचे सदस्य माजी न्यायमूर्ती संजय मेहरे, उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंह, माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माजी महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुवर्णा रावल, विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, समितीच्या सचिव श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, विधी सल्लागार श्रीमती तन्वी आनंद आणि जय संकलेचा उपस्थित होते.
नागरिकांच्या भावना आणि सामाजिक वास्तव जाणून घेण्यावर भर
जनसुनावणीदरम्यान नागरिकांना आपली भूमिका मांडण्यासाठी संधी देण्यात आली. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांचे अनुभव आणि दृष्टिकोन समितीने जाणून घेतले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी मांडलेल्या बाबींचे स्वरूप, त्यामागील सामाजिक संदर्भ आणि कायदेशीर पैलू समजून घेण्यावर समितीने भर दिला.
समानता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा समतोल साधण्याची भूमिका
समितीच्या सामूहिक भूमिकेनुसार, भारताची धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विविधता ही देशाची महत्त्वपूर्ण ओळख आहे. ही विविधता जपत नागरिकांच्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाशी संबंधित नागरी बाबींमध्ये समानता, न्याय, सुसूत्रता आणि कायदेशीर स्पष्टता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने विवाहासंबंधी कायदेशीर वय, नोंदणी, वैवाहिक हक्क व जबाबदाऱ्या; घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया, कारणे व संबंधित पक्षांचे अधिकार आणि संरक्षण; वारसा व उत्तराधिकार; तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील व्यक्तींचे कायदेशीर अधिकार, जबाबदाऱ्या आणि संरक्षण या चार प्रमुख विषयांचा समिती अभ्यास करीत आहे.
जनसहभागासाठी प्रत्यक्ष, दूरदृश्य आणि ऑनलाइन सुविधा
जनसुनावणी प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता न येणाऱ्या नागरिकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत समान नागरी कायदा पोर्टलवर 37 मुद्द्यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभिप्राय नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नागरिकांना आपली मते, सूचना, प्रश्न आणि अपेक्षा ऑनलाइन मांडता याव्यात, यासाठी अभिप्राय नोंदविण्याची मुदत 15 डिसेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये पार पडलेल्या जनसुनावणीच्या माध्यमातून समितीने नागरिकांची मते, अनुभव आणि भूमिका जाणून घेतली. विविधतेचा आदर राखणे, नागरिकांच्या भावनांप्रति संवेदनशील राहणे, प्रत्येक घटकाचा दृष्टिकोन समजून घेणे आणि संविधानिक मूल्यांच्या आधारे सर्वंकष अभ्यास करणे यावर समितीने विशेष भर दिला.
