Uncategorizedनियतकालिक श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्यम सर्वेक्षणांचा प्रारंभ

नियतकालिक श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्यम सर्वेक्षणांचा प्रारंभ

नियतकालिक श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्यम सर्वेक्षणांचा प्रारंभ
अचूक माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे: जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन
रत्नागिरी,(जिमाका):- जिल्ह्यातील रोजगार-बेरोजगारीची सद्यस्थिती आणि आर्थिक विकासाचा अचूक आढावा घेण्यासाठी ‘नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण’ (PLFS) आणि ‘असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण’ (ASUSE) या दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय सर्वेक्षणांचा जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते या दोन्ही सर्वेक्षणांचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. हे सर्वेक्षण मार्च २०२७ पर्यंत चालणार असून, जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी नागरिकांनी व व्यावसायिकांनी क्षेत्र अधिकार्‍यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या उद्घाटन प्रसंगी जिल्हा सांख्यिकी उपआयुक्त निवास यादव, प्. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वेक्षणाची प्रमुख उद्दिष्टे आणि महत्त्व:
रोजगार निर्मितीला गती (PLFS): नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील रोजगार, बेरोजगारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या स्थितीचा अचूक आढावा घेतला जाईल. या माहितीच्या आधारे भविष्यात कौशल्य विकास कार्यक्रमांना योग्य दिशा देणे आणि रोजगार निर्मितीच्या प्रभावी योजना राबवणे प्रशासनाला सहज शक्य होणार आहे.
असंघटित क्षेत्राचा कायापालट (ASUSE): असंघटित क्षेत्रातील उद्यमांच्या वार्षिक सर्वेक्षणातून जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची (MSME) सद्यस्थिती समोर येणार आहे. याद्वारे जिल्ह्याच्या एकूण उत्पादनातील वाढ (GDP) आणि विविध आर्थिक निर्देशांक परिगणित करण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
इप्सॉस (IPSOS) संस्थेमार्फत मार्च २०२७ पर्यंत सर्वेक्षण
अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने या सर्वेक्षणासाठी ‘इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड’ (IPSOS) या अधिकृत संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेचे प्रतिनिधी मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात जाऊन क्षेत्रकाम (Field Work) करणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील उद्दिष्ट:
या राष्ट्रीय सर्वेक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने घटकांची निवड करण्यात आली आहे:
नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणासाठी (PLFS): ७२ घटक (Samples)
असंघटित क्षेत्र उद्यमांच्या सर्वेक्षणासाठी (ASUSE): ६४ घटक
हे सर्वेक्षण जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने, नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकांना कोणतीही भीती न बाळगता संपूर्ण आणि खरी माहिती द्यावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात👉रत्नागिरी, (जिमाका):...