बोर्डाची परीक्षा देताय?भीती नको तयारी हवी!
परीक्षा दालनात पाऊल ठेवण्यापूर्वी….!
इयत्ता १० वीच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या मंडळ परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा !!.
इयत्ता दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेस बसणार असणार असल्याने त्यांचे मनामध्ये एक कुतहल असून एक अनामिक भीतीसुद्धा असते. पालकांना सुद्धा आपल्या पाल्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी याची काळजी असते. विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात. परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये यासाठी मार्गदर्शनपर माहिती प्रश्न-उत्तर स्वरूपात दिली आहे. विद्यार्थी व पालक यांचेकडून वारंवार मंडळाकडे विचारणा होणारे हे प्रश्न संकलित करून विद्यार्थ्यांना नक्कीच सहायक व मार्गदर्शक ठरतील..!
चालू वर्षीची मंडळ परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहे,याची जाणीव सर्व परीक्षार्थी यांना शिक्षक व पालकांनी करून द्यावी. विद्यार्थ्यांची भीती दडपण दूर व्हावी म्हणून समुपदेशकांचे मार्गदर्शन घेऊ शकता, मंडळाने प्रसिद्ध केलेले परीक्षेची संबंधित व्हिडिओ आणि प्रत्येक विषयाची उत्तरपत्रिका कशी लिहावी याबाबत मंडळाने मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने तयार केलेले आणि युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध केलेले व्हिडिओ नक्की पहा.
-राजेश क्षीरसागर.
विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ.
महत्त्वाचे…
इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेबाबत पालक व परीक्षार्थी यांच्याकडून वारंवार प्रश्न शाळा, शिक्षण विभागातील अधिकारी व मंडळाकडे विचारले जातात. त्यातील अधिकाधिक विचारल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांचे संकलन राज्य मंडळ व विभागीय मंडळातील कामकाजाचा अनुभव असलेले वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार यांनी केले आहे, ते प्रश्न उत्तरासह प्रसिद्ध करत आहोत.
प्रश्न ०१ : विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेबाबत कोणती काळजी घ्यावी?
उत्तर : विद्यार्थ्यांनी आपल्या बैठक व्यवस्थेबाबत परीक्षेच्या दिवसापर्यंत गाफील न राहता किमान ०२ दिवस अगोदर बैठक व्यवस्थेची खात्री करावी. केंद्रावर बैठक व्यवस्थेबाबत फलक दर्शनी भागावर लावले जातात. अवगत होत नसल्यास आपल्या केंद्र शाळेशी किंवा आपल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून बैठक व्यवस्था निश्चित करावी.
प्रश्न ०२ : परीक्षा दालनात परीक्षेसाठी किती वेळ अगोदर उपस्थित राहावे?
उत्तर : विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास आणि परीक्षा दालनात किमान अर्धा तास म्हणजेच सकाळ सत्रासाठी स. १०:३० वाजता व दुपार सत्रासाठी दुपारी ०२:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळ सत्रासाठी स. ११:०० नंतर व दुपार सत्रासाठी दु. ०३:०० नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा संचालन सुकर होण्यासाठी घंटेचे वेळापत्रक पहावे. तसेच गजर व टोल चा क्रम लक्षात घ्यावा.
प्रश्न ०३ : परीक्षेसाठी कोणते साहित्य बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे?
उत्तर : प्रवेशपत्र, परीक्षेसाठी किमान ०२ पेन (निळी / काळी शाई) परीक्षा पॅड, ज्यावर काही लिहिलेले नसावे, पारदर्शक पाणी बॉटल, शुगरचा विद्यार्थी असल्यास आवश्यक औषधे, गणित विषयासाठी आवश्यक असणारी विहित सामग्री. विद्यार्थ्यांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर किंवा इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा दालनात घेऊन जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत अनावधानाने अगर जाणीवपूर्वक कोणताही कागद खिशामध्ये, कंपास बॉक्समध्ये राहणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
प्रश्न ०४ : परीक्षा ब्लॉकमध्ये उत्तरपत्रिका वितरीत झाल्यानंतर काय करावे?
उत्तर : सर्वप्रथम बेंच सुस्थितीत असल्याची खात्री करावी. ही समस्या असल्यास बेंच बदलून घ्यावा. उत्तरपत्रिका नीट तपासून घ्यावी. उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून घ्याव्यात. सर्व पाने इ. १२ वी करिता २८ पाने, तर इ. १० वी करिता २० पाने सुस्थितीत असल्याची खात्री करावी. काही पाने खराब असल्यास, पान क्रमांक नसल्यास तातडीने पर्यवेक्षकांकडून सदरची उत्तरपत्रिका बदलून घ्यावी. जर पेपर लिहिताना काही वेळाने सदर बाब लक्षात आल्यास परीक्षार्थ्यांनी घाबरून न जाता आपल्या पर्यवेक्षकास सदर बाब निदर्शनास आणावी.
प्रश्न ०५ : एखाद्या पेपरला हॉल तिकीट विसरल्यास काय करावे?
उत्तर : घाबरून न जाता पर्यवेक्षक / केंद्रसंचालक यांना सदर बाब निदर्शनास आणावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते पण जाणीवपूर्वक विसरू नये. केंद्रसंचालकांकडे हमीपत्र लिहून द्यावे, दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र (Hall Ticket) न चुकता आणावे, ते केंद्रसंचालकांना दाखवावे.
प्रश्न ०६ : उत्तरपत्रिकेमध्ये कच्चे काम केले तर चालू शकते का?
उत्तर : कच्चा कामासाठी सोबत कागद न नेता उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर कच्चे काम अशी नोंद करावी, मात्र उत्तरपत्रिकेच्या कोणत्याही पानावर नाव, बैठक क्रमांक, देवाचे नाव, सांकेतिक खुण, पास करण्याची विनंती, नोटा चिकटवणे, विसंगत बाबी लिहिणे, इत्यादी प्रकार टाळणे आवश्यक आहे. कारण वरील कृती ही गैरमार्ग ठरून चौकशी अंती सदर विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द केली जाते. (बैठक क्रमांक पहिल्या पानावर विहित ठिकाणी नमूद करायचा असतो.)
प्रश्न ०७ : खाजगी प्रकाशकांकडून वेळापत्रके प्रसिद्ध होतात ती प्रमाणभूत मानावी का?
उत्तर : मंडळाने अधिकृत जाहीर केलेले जे आपल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रदर्शित केलेले आहे. तसेच मंडळाच्या मोबाईल अॅप मध्ये उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरील परीक्षेचे वेळापत्रक प्रमाणभूत मानावे.
प्रश्न ०८ : विद्यार्थ्यास नैसर्गिक आपत्ती, अपघात, संप बंद, या कारणांमुळे नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचू न शकल्यास काय करावे?
उत्तर : अपवादात्मक परिस्थितीत अशा प्रसंगी आपल्या नजीकच्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होता येते, पण संबंधित केंद्रसंचालकांना त्याची वस्तुस्थितीची खात्री पटवून देणे आवश्यक आहे.
प्रश्न ०९ : विद्यार्थ्यास माध्यम बदलून प्रश्नपत्रिका प्राप्त झाली किंवा अन्य विषयाची प्रश्नपत्रिका प्राप्त झाली तर काय करावे?
उत्तर : सदर बाब तातडीने पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्या निदर्शनास आणून चुकीची प्रश्नपत्रिका जमा करून योग्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रसंगी तातडीने सूचित करावे, वेळ वाया घालवू नये.
प्रश्न १० : एखादे उत्तर चुकल्यास किंवा उत्तर बदल करावयाचा असल्यास काय करावे?
उत्तर : अशा वेळी त्या उत्तरावर काट मारावी, कोणत्याही परिस्थितीत उत्तर चुकले आहे म्हणून उत्तरपत्रिकेचे पान फाडू नये. घाबरून ते सोबत घेऊन जाऊ नये. अशी कृती केल्यास व गैरमार्ग ठरवून शिक्षेस पात्र व्हाल, याची नोंद घ्यावी.
— दीपक पांडुरंग पोवार
वरिष्ठ अधीक्षक, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.
