रत्नागिरीमहाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला 'युनेस्को'चा वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासन सज्ज

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला ‘युनेस्को’चा वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासन सज्ज

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला ‘युनेस्को’चा वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासन सज्ज

‘Bappa.org’ द्वारे होणार गणेशपरंपरेचे जागतिक दस्तऐवजीकरण; WhatsApp वरून नागरिकांना सहभागी होता येणार

माहिती नोंदवणाऱ्या नागरिकांना मिळणार ‘Digital Cultural Preserver Certificate’
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा पुढाकार
रत्नागिरी, दि. १६ (जिमाका)- महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने यापूर्वीच ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. आता या गौरवशाली परंपरेला जागतिक स्तरावर अधिक भक्कमपणे पोहोचवण्यासाठी आणि युनेस्कोचा (UNESCO) सांस्कृतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम केवळ एका विभागापुरती मर्यादित न ठेवता सर्व विभागांनी समन्वयाने वर्षभर लोकचळवळ म्हणून राबवावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
३५ हून अधिक जागतिक शहरांतील परंपरांचे संकलन
गणेशोत्सवाशी संबंधित चालीरीती, कला, लोकजीवन आणि सांस्कृतिक वारशाचे संकलन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अधिकृत मंचावर महाराष्ट्र, देशभरासह ३५ हून अधिक आंतरराष्ट्रीय शहरांमधील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये, सार्वजनिक व घरगुती परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, खाद्यसंस्कृती, हस्तकला, छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना थेट WhatsApp द्वारे नोंदवता व अपलोड करता येणार आहेत. जनतेच्या सक्रिय सहभागातून आकारास येणारा हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी सांस्कृतिक दस्तऐवज ठरेल.

  • ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रम व डिजिटल प्रमाणपत्र :
    सार्वजनिक मंडळांसोबतच ऐतिहासिक व पारंपरिक घरगुती गणेशोत्सवाचे विधी आणि खाद्यपरंपरा Bappa.org वर नोंदवण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यापक जनजागृती केली जाईल. यात माहिती नोंदवणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • जे. जे. स्कूल ऑफ आर्टने साकारलेला ‘Mascot’ :
    या मोहिमेसाठी नामांकित ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ने तयार केलेल्या गणेशोत्सवाच्या अधिकृत शुभंकर चिन्हाचा (Mascot) प्रचार साहित्यामध्ये सर्वत्र वापर करण्यात येणार आहे.
  • कला व ६४ कलापरंपरांचे जतन :
    गणेशोत्सवाशी जोडलेले स्थानिक मूर्तिकार, कार्यशाळा, लोककलावंत आणि पारंपरिक कलाकारांच्या कौशल्याचे विशेष वार्तांकन करून पोर्टलवर उपलब्ध केले जाईल.
  • सोसायट्या आणि ग्रामपंचायतींचा सहभाग :
    गृहनिर्माण संस्था (Co-operative Housing Societies), निवासी कल्याणकारी संघटना (RWAs), ग्रामपंचायती आणि महिला बचत गटांच्या WhatsApp समूहांवर Bappa.org ची लिंक व QR कोड प्रसारित करण्यात येणार आहेत.
    “गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक व उद्यमशीलतेला चालना देणारी जीवनशैली आहे. हा समृद्ध वारसा युनेस्कोच्या पटलावर नेऊन जागतिक मानांकन मिळवून देण्यासाठी ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी करावी.”— ॲड. आशिष शेलार, मंत्री – सांस्कृतिक कार्य, ई.मा.तं. व कृत्रिम बुद्धिमत्ता, महाराष्ट्र राज्य

Breaking News