रत्नागिरी*मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा बळी- तुरळ येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच...

*मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा बळी- तुरळ येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, प्रशासनाचा अनास्थेचा कळस!

*मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा बळी- तुरळ येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, प्रशासनाचा अनास्थेचा कळस!

​संगमेश्वर/एजाज पटेल

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाच्या आणि महामार्ग कंत्राटदारांच्या जीवघेण्या कारभाराने पुन्हा एकदा एका तरुण जिवाचा बळी घेतला आहे! महामार्गावर तुरळ या ठिकाणी पडलेले मृत्यूचे सापळेसदृश्य खड्डे आणि वाढलेला वेग यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा ग्रामीण रुग्णालयात आणण्यापूर्वीच जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

​संगमेश्वर पोलिसां कडून प्राप्त माहिती नुसार अनिकेत नारायण लाड (वय ३० वर्षे, मूळ रा. पाचळ, ता. राजापूर) आणि सचिन शांताराम गुरव (वय ४१ वर्षे, रा. निगुडवाडी, ता. संगमेश्वर) हे दोघे १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री मुंबईतील भोईवाडा येथून आपल्या मूळ गावी निगुडवाडी येथे घटस्थापनेचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ०३ ईई ८३५६) निघाले होते. आनंदाने घराकडे निघालेल्या या दोन मित्रांचा प्रवास सुरळीत सुरू असताना, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे पोहोचली.

​तुरळ परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी असलेले खड्डे आणि प्रशासनाची तीव्र अनास्था या अपघाताला कारणीभूत ठरली आहे. रस्त्यावरील याच जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणि दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे आणि अचानक खड्डा समोर आल्याने अनिकेत लाड यांचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला. अनियंत्रित झालेली दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक लोखंडी कठड्यावर जाऊन अतिशय वेगात आपटली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर सिमेंट रोडवर जोरात फेकले गेले.

​या दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वार अनिकेत लाड यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला अतिशय गंभीर दुखापती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्यांचा प्राणज्योत मालवली होती. तर त्यांचे सोबती असलेले निगुडवाडी येथील सचिन गुरव हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विवेक साळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महाजन आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या सचिन गुरव यांच्यावर प्रथम संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, व त्यानंतर त्यांना पुढील अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉकटर अभिजित मोरे यांच्या सल्ल्याने १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​घटस्थापनेसारख्या पवित्र सणासाठी मुंबईहून आपल्या कुटुंबात आनंदाने येणाऱ्या तरुणांचा महामार्गावरील खड्ड्यांमुळे असा अकाली मृत्यू झाल्याने निगुडवाडी गावात आणि मृतकाच्या गाव परिवारामध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर नोंद करण्यात आली असून पोलीस या भीषण अपघाताचा पुढील गंभीर तपास करत आहेत.

Breaking News

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात गौरव

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना'त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात...