रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची सभा खेड येथे संपन्न झाली-.
👉🏻रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रेमासिक सभा खेड येथे रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी समन्वय समिती अध्यक्ष श्री सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिक संघांच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या सर्व विषयांवर चर्चा झाली. राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्याबाबतच्या दि. ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्ह्यातील संबंधित प्रशासकीय अधिकारी कार्यवाही करीत नाहीत. समन्वय समितीच्या तसेच जिल्हा ज्येष्ठ नागरिक संवर्धन व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करूनही ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लावले जात नाहीत असे सभेला उपस्थित असलेल्या सर्व संघ प्रतिनिधींनी मांडले. प्रशासनाच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या उदासीन व्रृत्तीबद्दल सभेने नाराजी व्यक्त केली.
दि. ९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानंतर पालक मंत्री महोदयांनी त्वरित सर्व संबंधित अधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना शासन निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत निर्देश दिले होते. तथापी ८ वर्षे उलटूनही परिणामकारक कार्यवाही होत नाही. या संबंधात मागणी करूनही पालक मंत्री महोदयांनी अद्याप बैठक बोलावली नसल्याने आपले प्रश्न सुटत नाहीत असे अध्यक्षानी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवास भाड्यातील सवलतीसाठी जारी केलेले एन सी एम सी कार्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक आहे. राज्याच्या दुर्गम भागात काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांनाही कार्ड गैरसोयीचे व वेळ काढू झाले आहे. ७५ वर्षांवरील म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिकाना एस टी प्रवास पूर्णत: मोफत असताना एन सी एम सी कार्डची सक्ती अनाकलनीय व अनावश्यक आहे . सबब अमृत ज्येष्ठ नागरिकाना या सक्तीतून वगळण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे आग्रही मागणी करावी असे जिल्हा पालक मंत्री व अन्य विधानसभा/विधान परिषद सदस्याना लेखी पत्राद्वारे विनंती करूनही अद्याप या विषयावर कोणाही लोक प्रतिनिधींनी प्रतिसाद दिला नसल्याचे अध्यक्षानी सांगितले.
यजमान खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने सभेचे व सभेनंतरच्या स्नेह भोजनाचे उत्तम नियोजन केले होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
