रत्नागिरी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन तसेच रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एस. आर. के. तायक्वांदो क्लबच्या सहकार्याने रत्नागिरी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे पार पडली. १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या विविध गटांमध्ये ही स्पर्धा जिल्हा क्रीडा विजय शिंदे आणि तालुका अधिकारी गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
घेण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे सर आणि तालुका अधिकारी जगताप सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. तालुका समन्वयक विनोद मयेकर आणि स्पर्धाप्रमुख लीना घाडीगावकर तसेच सर्व प्रमुख प्रशिक्षक आयोजक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन तालुका समन्वयक विनोद मयेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी स्पर्धाप्रमुख लीना घाडीगावकर तसेच मयेकर सर यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील पंच म्हणून साहिल मुरुडकर, वेदांत चव्हाण, श्रुती चव्हाण, हेरंब भिडे आणि संकेता सावंत यांनी जबाबदारी पार पाडली. तालुका समन्वयक, स्पर्धा प्रमुख आणि सर्व पंच प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत, रुपेश तावडे आणि शाहरुख शेख यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्हा तायकवान्डो संघटनचे अध्यक्ष व्यंकटेश करा तसंच सचिव लक्ष्मण करा यांनीही उपस्थित सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसंच या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाची भावना विकसित होत असून, तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. स्पर्धेला खेळाडू, क्रीडाशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन सोनाली सावंत यांनी केले.
