राजापूर हायस्कूलमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात; विद्यार्थिनींना महिला व बालसुरक्षा योजनांविषयी मार्गदर्शन
रत्नागिरी, (जिमाका) : राष्ट्रीय पोषण अभियान पंधरवड्याचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एकात्मिक बाल विकास योजना, जिल्हा बाल संरक्षण कक्ष संलग्न चाईल्ड हेल्पलाइन आणि सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर हायस्कूलमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सेवा परमो धर्म:’ या भावनेतून उपस्थित किशोरवयीन विद्यार्थिनींना विविध कल्याणकारी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात ‘मिशन शक्ती’ अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, सखी निवास, पाळणाघर योजना आणि महिला सक्षमीकरण विषयक उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत बालकांसाठीची चाईल्ड हेल्पलाइन (१०९८), बालहक्क, बालसुरक्षा यंत्रणा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श (Good Touch & Bad Touch) याविषयी प्रबोधन करण्यात आले. याशिवाय लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो – POCSO २०१२) या कायद्याबाबत विद्यार्थिनींना जागरूक करण्यात आले.
याप्रसंगी राजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. हर्षाली यांनी किशोरवयीन वयातील शारीरिक व मानसिक बदल आणि वैयक्तिक आरोग्याविषयी माहिती दिली. अंगणवाडी मुख्यसेविका श्रीमती आंबवले यांनी वाढत्या वयातील पोषण, सकस आहार आणि त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या जनजागृती कार्यक्रमास राजापूर नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. चव्हाण, नगरसेविका सौ. नार्वेकर, राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पोवार, सहाय्यक शिक्षक, सखी वन स्टॉप सेंटरच्या ॲड. स्वरा मयेकर, चाईल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी श्रीमती ऐश्वर्या लाड यांच्यासह शहरातील अंगणवाडी सेविका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
