- लांजा-राजापूरच्या शेती विकासासाठी आमदार किरण सामंत यांची कोकण कृषी विद्यापीठाला भेट*
लांजा आणि राजापूर तालुक्यांतील शेतीचा विकास, माती परीक्षणाला चालना तसेच पारंपरिक फळबागांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने आमदार किरण सामंत यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी विद्यापीठातील अधिकारी व कृषी तज्ज्ञांसोबत सविस्तर चर्चा केली.
लांजा आणि राजापूर भागात शेती आणि फळबागांची मोठी परंपरा आहे. येथील हवामान, मातीचा पोत आणि भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. आंबा, काजू यांसारख्या पारंपरिक फळबागांचे नियोजन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि जमिनीच्या आरोग्यानुसार पिकांची निवड यावर चर्चा करण्यात आली.
माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची नेमकी माहिती मिळते. त्यामुळे खतांचा योग्य वापर, खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ साधता येते, असा मुद्दा मांडण्यात आला. तसेच कृषी विद्यापीठातील संशोधन आणि तज्ज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांमध्ये अधिक समन्वय साधण्यावरही विचार झाला.
कोकणातील पारंपरिक फळबागांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ दिल्यास स्थानिक शेतीला नवी गती मिळू शकेल. लांजा व राजापूरमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक तांत्रिक मदत व मार्गदर्शन मिळावे, हा या भेटीमागचा मुख्य हेतू होता.
या प्रसंगी विद्यापीठ अभियंता राहुल घाडगे, शिक्षण संचालक डॉ. नारखेडे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, डॉ. एस. डी. देसाई, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अरुण माने, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उद्योजक सचिन पाकळे उपस्थित होते.
