लाटवण येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी व आधार सुविधा शिबिर उत्साहात
उपसभापती दीपक मालुसरे यांच्या हस्ते उद्घाटन; स्वतः आरोग्य तपासणी करून आदिवासी बांधवांना दिला सहभागाचा संदेश
रत्नागिरी, (जिमाका) : क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या नियोजनानुसार एकलव्य आदिवासी वाडी, लाटवण (ता. मंडणगड) येथे भव्य आरोग्य शिबिर आणि आधार कार्ड अद्ययावतीकरण सुविधा केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड पंचायत समितीचे उपसभापती दीपक मालुसरे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली. यावेळी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा (कादवन) चे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांनी प्रास्ताविकातून बिरसा मुंडा यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडला. तसेच, कागदपत्रांमधील उणिवांमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आधार अद्ययावतीकरण आणि उत्तम आरोग्याचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (पेण) चे प्रतिनिधी श्री. तोडे सर यांनी ‘न्यूक्लिअस बजेट’ (Nucleus Budget) आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत सविस्तर माहिती दिली. आरोग्य विभागाच्या सी.एच.ओ. श्रीमती अँथनी यांनी आरोग्य खात्यामार्फत मिळणाऱ्या विविध मोफत सुविधांचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात उपसभापती श्री. मालुसरे यांनी सर्व आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. भाषणाच्या निव्वळ औपचारिकतेपलीकडे जात श्री. मालुसरे यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून शिबिराचे उद्घाटन केले आणि इतरांनाही तपासणी व आधार नोंदणीसाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमास महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री. गायकवाड, श्रीमती मुल्ला, वाडीचे अध्यक्ष श्री. घोगरेकर, पोलीस पाटील अनंत कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मोहन जाधव, सदस्य रंजना जाधव, तलाठी कार्यालयाचे प्रतिनिधी सनी गोपाळ, आरोग्य सेवक श्री. कांबळे, आशा सेविका श्रीमती. शिंदे, अंगणवाडी सेविका श्रीमती कासारे आणि आधार केंद्र प्रतिनिधी श्री साळुंखे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांनी सर्व विभागांच्यावतीने उपस्थितांचे आभार मानले.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
