श्री महालक्ष्मी मिनी मॉलच्या आगीचं तातडीनं सर्वेक्षण करण्याचे ना. उदय सामंत ह्यांचे विमा कंपन्यांना निर्देश

0
3

श्री महालक्ष्मी मिनी मॉलच्या आगीचं तातडीनं सर्वेक्षण करण्याचे ना. उदय सामंत ह्यांचे विमा कंपन्यांना निर्देश-

👉🏻रत्नागिरी शहरातील के. सी. जैन नगर, मारुती मंदिर परिसरातील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मिनी मॉलला ऐन भाऊबीजेच्या पहाटे भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत मॉलमधील विविध आस्थापनांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी बोलताना, सणासुदीच्या काळात वर्षानुवर्षांच्या कष्टातून उभा केलेला व्यवसाय आगीच्या भक्ष्यस्थानी पडणं, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या संकटातून नुकसानग्रस्त दुकानदारांना पुन्हा ताकदीनं उभं करणं, ही माझीदेखील जबाबदारी आहे.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यापासून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळेपर्यंत मी स्वतः व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात होतो. अग्निशमन दलानं चार ते पाच तास अथक प्रयत्न करत १० ते १५ बंबांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नुकसानग्रस्त व्यावसायिकांना विम्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी संबंधित विमा कंपन्यांना आजच नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या आगीमुळे प्रभावित झालेल्या मॉल लगतच्या आणखी एका दुकानाचंही स्वतंत्र सर्वेक्षण करण्यास सांगितलं आहे.

या दुर्घटनेनंतर आवश्यक उपाययोजना करून येत्या तीन ते चार दिवसांत श्री महालक्ष्मी मिनी मॉल पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीनं आवश्यक कार्यवाहीला गती देण्यावर भर दिला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक अग्निसुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

आगीनं दुकानांचं नुकसान झालं असलं, तरी व्यापाऱ्यांची जिद्द आणि पुन्हा उभं राहण्याचा विश्वास कमी होता कामा नये. या कठीण प्रसंगी नुकसानग्रस्त व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना पुन्हा पूर्ववत व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सहकार्य आणि पाठपुरावा करण्याचा माझा निर्धार आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here