सावर्डे विद्यालयाची मैदानी स्पर्धेत पदकांची लयलूट
धावणे, उड्या, फेकी व रिले प्रकारांत खेळाडूंची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सावर्डे (प्रतिनिधी) : डेरवण येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत दमदार कामगिरी करत अनेक पदकांवर आपले नाव कोरले. १४ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी धावण्याच्या शर्यती, लांब व तिहेरी उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हर्डल्स आणि रिले प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून क्रीडा कौशल्याची प्रचिती दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
१४ वर्षे मुलांच्या गटात रुद्र खापरे याने २०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले, तर आर्यन घाणेकर याने ६०० मीटर व गोळाफेकमध्ये कांस्यपदक पटकावले. ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
मुलींच्या याच वयोगटात कस्तुरी घाग हिने २०० व ४०० मीटरमध्ये दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. अर्णवी चव्हाण हिने २०० मीटर, तर आदिती पाष्टे हिने १०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. स्वरा राणीम हिने ६०० मीटरमध्ये आणि स्वरा धावडे हिने गोळाफेकीत प्रथम क्रमांक मिळवला. ४×१०० मीटर रिले संघानेही बाजी मारली.
१९ वर्षे मुलींच्या गटात प्रांजल हुमणे हिने १०० मीटर, लांब उडी आणि तिहेरी उडी या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावत विशेष कामगिरी केली. रुद्रा हुमणे हिने ४०० मीटरमध्ये प्रथम व ११० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सृष्टी खेराडे हिने गोळाफेक, थाळीफेक व भालाफेकमध्ये सुवर्णपदके पटकावली. श्रावणी हुमणे हिने गोळाफेक व भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. ४×४०० मीटर रिले संघ प्रथम, तर ४×१०० मीटर रिले संघ द्वितीय ठरला.
१९ वर्षे मुलांच्या गटात सागर शर्मा याने १५०० मीटर, ३००० मीटर व ५ किलोमीटर क्रॉस-कंट्रीमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तीन सुवर्णपदके पटकावली. पृथ्वी राजभर याने ८०० व १५०० मीटरमध्ये द्वितीय, तर ५ किलोमीटर क्रॉस-कंट्रीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. श्रवण आग्रे याने ३००० मीटरमध्ये द्वितीय, अजिंक्य भायजे याने थाळीफेकीत प्रथम व गोळाफेकीत तृतीय, तर विघ्नेश घाणेकर याने ४०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, विश्वस्त व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व पदाधिकारी, शालेय समिती सदस्य तसेच मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
सावर्डे विद्यालयाची मैदानी स्पर्धेत पदकांची लयलूट – धावणे, उड्या, फेकी व रिले प्रकारांत खेळाडूंची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
