सावर्डे विद्यालयातील विद्यार्थी रमले इंग्रजी शब्दांच्या दुनियेत

0
5

सावर्डे विद्यालयातील विद्यार्थी रमले इंग्रजी शब्दांच्या दुनियेत!
इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाराशे विद्यार्थ्यांचा सहभाग
सावर्डे : महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यालयाच्या विद्यार्थी समूहाच्या वतीने इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे, भाषिक कौशल्य विकसित करणे तसेच शब्दकोशाचा प्रभावी वापर करण्याची सवय लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दहा वीस तीस या पटीत अचूक इंग्रजी शब्द पाठ करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोख रकमेचे प्रोत्साहन पर बक्षीस निश्चित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.या स्पर्धेची संकल्पना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी मांडली, तर स्पर्धेच्या नियोजनासाठी जयंत काकडे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांचे अर्थ त्वरित शोधता यावेत, शब्दकोश कसा हाताळावा याचा सराव व्हावा आणि जास्तीत जास्त शब्द अचूक पाठांतर करून भाषा समृद्ध करावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरावा आणि विद्यार्थ्यांनी सुट्टीतही ज्ञानार्जनाचा आनंद घ्यावा, यासाठी विद्यालयाने विद्यार्थ्यांना ४०० इंग्रजी शब्दांची झेरॉक्स सुट्टीपूर्वी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत इंग्रजी शब्दांच्या दुनियेत रममाण होत पाठांतराचा सराव केला. या उपक्रमाला विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अंतिम स्पर्धेत सर्व शब्दांमधून सर्वाधिक शब्द अचूक सांगणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात इंग्रजी विषय शिक्षकांनी वर्गनिहाय पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी देण्यात आली. अंतिम फेरीत इयत्ता आठवीचे ३४, नववीचे ३६ आणि दहावीचे ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून यश मिळवले

इयत्ता पाचवीतील यशस्वी विद्यार्थी : मिंसा तांबे, गौरी वास्कर, भावेश माने आणि श्रवण भुवड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. हर्ष राडे व चैतन्य जाधव यांनी द्वितीय, तर नेत्रा कवडे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
इयत्ता सहावीतील यशस्वी विद्यार्थी : मनीषा रायिका, अन्वी सानप, पार्थ कदम आणि ऋषिकेश खैर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विधी चव्हाण, वसुंधरा पाटील व रेहा राजेशिर्के यांनी द्वितीय, तर श्रीपाद धुरी व भूमी जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
इयत्ता सातवीतील यशस्वी विद्यार्थी : सिद्धी इंगळे, आरोही चव्हाण, स्वागत सरमळकर, अक्षरा भुवड, दूर्वा भुवड, वैष्णवी गुरसाळे, शुभ्रा जाधव, अवनी पानसे, अर्णव जाधव आणि गंधर्व कवळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अथर्व शेंडगे, श्रीराम पवार, शिवराज माळवतकर, इम्तियाज अन्सारी, मनस्वी जाधव व कोजागिरी कुंभार यांनी द्वितीय, तर स्नेहल घोरपडे, विहान सुर्वे व समृद्धी चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह समृद्ध करण्याबरोबरच शब्दकोश हाताळण्याचे कौशल्य, इंग्रजी शब्दांचे अर्थ समजून घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरला. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्टीचा वेळ विद्यार्थ्यांनी ज्ञानवृद्धीसाठी सत्कारणी लावला.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहाय्यक शिक्षिका शिल्पा राजेशिर्के, प्रशांत सपकाळ, मंगेश दाते, अशोक शितोळे, नारायण कलप, दादासाहेब पांढरे आणि अमृता घाग यांनी विशेष प्रयत्न केले. या अभिनव उपक्रमाचे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here